udhav thackrey

भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने हिंदुत्व सोडले आणि ते आता जनाब झाले आहेत, असे म्हणत त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्याला डिवचले आहे. दुसरीकडे एमआयएम सारख्या पक्षांकडून आघाडीत घेण्याचे आवाहन केले जात आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचेच नियोजन असल्याचे स्पष्ट दिसते आहे. कारण एमआयएम या पक्षामुळे आघाडीतील समाजवादी पक्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांना सा-या पुरोगामी पक्षांना संदेह आहे. शिवाय शिवसेना हिंदुत्वाचे नारे देत ‘भाजपला सोडले हिंदुत्वाला नाही’ असे म्हणत आहे.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासाठी आगामी काही महिन्यांचा काळ राजकीयदृष्ट्या कसोटीचा असणार आहे. कोरोनानंतर आणि त्यांच्या व्यक्तिगत आजारपणानंतर त्यांनी आता पक्षसंघटना आणि आगामी निवडणुकांच्यासाठी मोर्चेबांधणी यावर लक्ष देण्याचे ठरविले आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षावर बोचरी टिका आणि मार्मिक घाव घालत ते आपल्या पक्षाचा आणि आपल्या वैयक्तिक राजकीय दृष्टीकोनाचा नवा प्रवास कसा असेल ते सांकेतिक पध्दतीने बोलताना दिसत आहेत. २० मार्चला त्यांनी लाईव्ह संदेश देत जी बैठक घेतली त्यात राज्यात फिरून पक्षाच्या कार्यकर्त्याचा जागर करण्याचा त्यांचा मनोदय दिसला.

    कानाकोप-यात जावून भेटण्यासाठी नियोजन
    गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री खूपच अडकून पडले आहेत. अगदी कोरोना संसर्गापासून तर त्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यावरून टिकाही होते. ते दौ-यांवर जात नाहीत गेलेच तर काही मिनीटांचे दौरे करून येतात. मंत्रालयात येत नाहीत कार्यालयीन कामकाजही ते घरातून पाहतात. आणि अधिवेशनातही सहभागी होत नाहीत म्हणून त्यांच्यावर टिका झाली आहे. प्रकृती अस्वास्थ या कारणाने ते त्यांच्या पक्षांतील लोकांपासून सामान्य जनतेलाही दुरावले आहेत. याची जाणिव त्यांना स्वत:ला झाली आहे ते सध्याच्या त्यांच्या भाषणातून जाणवले आहे. त्यामुळे ते आता कानाकोप-यात जावून भेटण्यासाठी नियोजन करत आहेत. शिवसंपर्क यात्रा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या खासदार आणि जिल्हाप्रमुखांना जागविले आहे. त्यांच्यात आता भाजप विरोधात लढण्याची चेतना जागविताना ते दिसले.

    तीन विसंगत विचारसरणीच्या पक्षांमध्ये असमंजस
    भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने हिंदुत्व सोडले आणि ते आता जनाब झाले आहेत, असे म्हणत त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्याला डिवचले आहे. दुसरीकडे एमआयएम सारख्या पक्षांकडून आघाडीत घेण्याचे आवाहन केले जात आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचेच नियोजन असल्याचे स्पष्ट दिसते आहे. कारण एमआयएम या पक्षामुळे आघाडीतील समाजवादी पक्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांना सा-या पुरोगामी पक्षांना संदेह आहे. शिवाय शिवसेना हिंदुत्वाचे नारे देत ‘भाजपला सोडले हिंदुत्वाला नाही’ असे म्हणत आहे. तेंव्हा आघाडीच्या तीन विसंगत विचारसरणीच्या पक्षांमध्ये असमंजस निर्माण होवून त्यांच्यात फूट फडण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि महापालिका निवडणुकांच्या गदारोळात आयाराम गयाराम सुरू असताना त्यांचे स्थानिक बेरीज वजाबाकीच्या गणितामध्ये त्यांच्या आमदारांची राजकीय अडचण झाली तर येत्या तीन महिन्यात सरकारमध्ये सेंध मारणे शक्य आहे असा कयास या राजकारणामागे आहे.

    राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण करण्याची खेळी
    मात्र भारतीय जनता पक्षाच्या राजकीय आडाख्यांमध्ये शिवसेनेला आता आपल्या अस्तित्वासाठी मुळचा शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्व हा वाघनखी बाणा जोपासावा लागणार आहे. त्याचवेळी मुस्लिम तुष्टीकरणासाठी एमआयएम सारख्या पक्षांना चुचकारत आघाडीत जाण्याची खेळी केल्यास मुस्लिम मतांमध्ये फूट होवून या पुरोगामी पक्षांना त्याचा फटका बसेल असा कयास लावला जात आहे. त्यातच मराठीबाणा आणि हिंदुत्वांचा नारा देत मनसे देखील सज्ज आहे. त्यामुळे राजकीय विचार आणि तत्वांची पळवापळवी करत राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण करण्याची भाजपची खेळी आहे.

    सेनेला मग ‘एकला चलो’ शिवाय पर्याय राहणार नाही
    राजकीय निरिक्षकांच्या मते २०१९मध्ये जे भाजपने केले त्याचा हा दुसरा भाग आहे. त्यावेळी मोठी राजकीय घराणी फोडून त्यांच्या वारसांना भाजपाकडे नेताना मुले पळविणारी टोळी असे त्यावेळी गमतीने म्हटले जात होते. त्याच प्रकारे एमआयएम जशी वंचित बहुजन सोबत जावून मतांचे ध्रुवीकरण करत दलितांच्या मतांवर औरंगाबाद मध्ये लोकसभा जिकंती झाली तशीच ती प्रस्थापित पुरोगामी पक्षांसोबत आघाडीत सहभागी झाली तर शिवसेनेची पंचाईत होणार आहे. कारण हिंदुत्वाचा अजेंडा घेत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत कसेबसे महाविकास चा गाडा रेटणा-या सेनेला मग ‘एकला चलो’ शिवाय पर्याय राहणार नाही. जेणे करून भाजपसाठी तीन पक्षांच्या एकजुटीत फूट पाडून लक्ष्य गाठता येणे शक्य होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि येत्या काळात विधानसभा हिंदु मुस्लिम ध्रुवीकरणाच्या माध्यमातून जिंकण्याच्या भाजपच्या व्यापक नियोजनाचा भाग एमआयएमचा अजेंडा आहे. हे ठाकरे समजून आहेत.

    दुबळा विरोध करणा-या पक्षांची गोंधळाची स्थिती
    यावेळी त्यानी हिदुत्व सोडले नाही म्हणत जर पुन्हा आपल्या मुळच्या विचारांचा आसरा घेतला तर प्रथम कॉंग्रेसची अडचण होणार आहे. त्यांच्या शिवाय सपा आणि राष्ट्रवादीला देखील सेनेसोबत निवडणुका एकत्र लढणे शक्य होणार नाही. अश्यावेळी भाजप वन टू वन लढत वेगवेगळ्या लढणा-या पक्षांना नामोहरम करू शकते असा राजकीय व्यूह रचनेचा आराखडा तयार केला जात असल्याने ठाकरे सरकारसाठी येणारा काळ कसोटीचा राहणार आहे. त्यांच्या सरकारची कामे फारशी जनतेला सांगण्याची स्थिती नाही, सध्या केंद्रीय यंत्रणांच्या दबावतंत्राने सेनेप्रमाणे भाजप विरोधी सारेच पक्ष घायाळ आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला येत्या काळात यामध्ये अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणजे सत्ता आणि पैसा या दोन्ही बाबतीत हे पक्ष दुबळे झाल्यास त्यांना हरविणे भाजपला शक्य होणार आहे. असे राजकीय निरिक्षक सांगतात. एकूणच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह भाजपला दुबळा विरोध करणा-या पक्षांची राजकीय गोंधळाची स्थिती अडचणीची होणार आहे. त्यात भाजपकडून मुद्यांची विचारसरणीच आणि उमेदवारांची पळवापळवी केली जाणार आहे. आयकर, इडी, सिबीआयचा ससेमिरा लावला जाणार आहेच, म्हणजे मग राज्यातील सत्ताधारी पक्षांचे अवसान राजकीय लढाईत राहणार की नाही हा मुद्दा निर्माण होणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात जुन अखेर पर्यंत आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यासाठी ‘राजा जागा रहा रात्र वै-याची आहे’ हाच एक महत्वाचा सल्ला राहणार आहे.

    – किशोर आपटे