बैलगाड्यावर निघाली शेतकऱ्याची अंत्ययात्रा

मुलांपेक्षा जास्त प्रेम ते बैलांवर करत होते. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अत्यानंद झाला होता.

  • लाडक्या बैलांसह ग्रामस्थही गहिवरले

  रांजणी : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात शेतकऱ्यांच्या रोमारोमात बैलगाडा भिनला आहे. कर्करोगाने निधन झालेल्या बैलगाडा मालकाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याचे काम चार बैलांसह घोडीने साकोरे (ता. आंबेगाव) येथे केले. घोडनदीच्या तीरावर वैकुंठधाममध्ये या शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना ग्रामस्थांसह मुकी जनावरेही भाऊक झाली.

  बबन सावळेराम लोहोटे ( वय ७२) असे मृत्यू झालेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे. कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, पत्नी, नातू असा परिवार आहे. लोहोटे यांना फक्त वीस गुंठे जमीन आहे. बैलांचा ओला -सुका चारा व उदरनिर्वाहासाठी ते पारंपरिक पिके घेत होते. त्यांची दोन्ही मुले लष्करात देशसेवा बजावत आहेत. पत्नी व नातवाला बरोबर घेऊन त्यांनी चार बैल आणि एका घोडीची जोपासणा केली. त्यांच्या खुराकासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केला.

  मुलांपेक्षा बैलांवर करायचे अधिक प्रेम

  मुलांपेक्षा जास्त प्रेम ते बैलांवर करत होते. भावकी आणि मित्रमंडळींना एकत्र करून प्रत्येक यात्रेत बैलगाडा घाटात ते बैलांची बारी करत होते. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अत्यानंद झाला होता.

  दोन वर्ष बंद असलेला बैलगाडा पुन्हा सुरू होणार म्हणून आनंदी असलेले बबन भेटायला येणाऱ्या आप्तेष्ट मित्रमंडळींना बैलगाडा मालकांना आवर्जून सांगायचे आता मी जगणार नाही. पण माझी शेवटची इच्छा म्हणजे माझी अंत्ययात्रा बैलगाड्यावरच वाजतगाजत काढा. तरच मला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिल्यासारखे होईल असे सांगताना त्यांना गहिवरून यायचे.

  घाटात बारी पुकारण्याची इच्छा अपूर्ण

  घाटात माझी बारी पुकारली जावी ही त्यांची शेवटची इच्छा होती. पण नियतीला ते मान्य नव्हते. बबन यांच्या जाण्याने शोकाकुल झालेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांची अखेरची अंत्ययात्रा सनई, ताशासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत काढली. यावेळी नातेवाईकांसह संपूर्ण गावाला गहिवरून आले होते.