Google made people slaves, study and reading stopped

लोकांना आता सर्वच रेडिमेड हवे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून तर सर्वच क्षेत्रातील लोक गुगलवर विसंबून असतात. इतकेच नव्हे तर कोणत्या आजारावर कोणते औषध घ्यायचे यासाठीही आता गुगलची मदत घेतली जाते.

संपूर्ण जग सध्या माहिती तंत्रज्ञानावर विसंबून आहे. जेव्हा गुगल नव्हते तेव्हा लोक त्यांची कामे कशी करीत होती. तेव्हा तर सर्वच कामे सुरळीत होत होती. विज्ञानाच्या प्रगतीचे सर्वत्र स्वागत करण्यात येते आणि ते केलेही पाहिजे. परंतु पूर्णपणे विज्ञानावरच अवलंबून राहणेही चुकीचे आहे. पूर्वी लोक बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार अगदी तोंडी करीत होते. अनेकांना तर सव्वा आणि दीडचाही पाढा पाठ होता. परंतु जेव्हा कॅलक्युलेटर आले, तेव्हापासून लोकांनी तोंडी हिशेब करणेच बंद करून टाकले. ते सर्व कॅलक्युलेटरवरच विश्‍वास करू लागले. अशीच परिस्थिती गुगलच्या बाबतही झालेली आहे. कोणतीही माहिती मिळवायची असेल तर लोक लगेच गुगल सर्च करतात. लोकांनी वाचन करणेच सोडून दिले आहे.

संदर्भग्रंथही आता कोणीही पाहत नाही. लोकांना आता सर्वच रेडिमेड हवे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून तर सर्वच क्षेत्रातील लोक गुगलवर विसंबून असतात. इतकेच नव्हे तर कोणत्या आजारावर कोणते औषध घ्यायचे यासाठीही आता गुगलची मदत घेतली जाते. गुगलवरून माहिती घेणे योग्य असले तरी सर्वस्वी गुगलवरच विसंबून राहणे हे कितपत योग्य आहे? यामुळे लोकांची स्मरणशक्ती, वाचन करण्याची प्रवृत्तीच संपून जाईल स्वावलंबी न होता लोकांमध्ये परावलंबित्व येईल. आता तर अशी अवस्था आहे की, पूजा करण्यासाठीसुद्धा गुगलवर आरती शोधण्यात येते. घरी एखादा नवीन पदार्थ बनवायचा झाल्यास गृहिणी गुगलवर रेसिपी शोधतात. एखादा प्रोजेक्ट जरी तयार करायचा झाल्यास “गुगल शरणमं गच्छामि’ शिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहिलेला नाही.

अभ्यास व वाचन करणे झाले बंद

अभ्यास करणे अन पुस्तक वाचण्याची आवडही आता संपुष्टात आलेली आहे. विद्यार्थ्यांना आणि विविध क्षेत्रातील लोकांना संदर्भाची माहिती असायला हवी. परंतु सर्वच बाबी गुगलवर उपलब्ध असल्यामुळे डॉक्टर, वकील, इंजिनिअर, आर्किटेक्ट ही सर्वच मंडळी आता गुगलवरच विसंबून असते. यामुळे लोक आळशी झालेले आहे. जर २४ तास पाणीपुरवठा असेल तर विहीर खोदण्याची काय आवश्यकता? अशीच काहीशी परिस्थिती झालेली आहे. गुगलच्या मदतीने काही नावीन्यपूर्ण लिखाण करता येऊ शकते, परंतु पूर्णच्या पूर्ण गुगलवरील लिखाणाची नक्कल करणे हे कितपत योग्य आहे?

गुगलमुळे अनेक सुविधा मिळाल्या

गुगलमुळे लोकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत. गुगलॲपवरून टॅक्सी बोलावणे, हॉटेलमधून भोजन मागविणे तसेच वेगवेगळ्या कंपन्यांकडून विविध वस्तूंची मागणीसुद्धा गुगल अपवरून करता येऊ शकते. एकूणच गुगलचे महत्त्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे. इतक्या महत्त्वाच्या या गुगलची सेवा गेल्या सोमवारी भारतासह युरोप, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा इत्यादी देशात बंद पडल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. गुगल ॲप बंद पडल्यामुळे अनेकांनी ट्विटची मदत घेणे सुरू केले. जवळजवळ तासभर गुगल, यु ट्यूब, जी मेल इत्यादी सेवा बंद होत्या. गुगल बंद पडल्यामुळे जगामध्ये व्हॉटसॲपवरील ट्रॅफिक वाढले. अनेकांना मॅसेजही करता येत नव्हते. ई मेल, व्हीडिओ सेवाही बंद पडल्या. गुगल सेवा जगात इतकी महत्त्वाची झालेली आहे की, ही सेवा बंद पडल्यामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला.