बेसहारांच्या हक्कासाठी त्यानं केला निर्धार, देऊन मायेचा हात बनला मनोरुग्णांचा आधार…

     

    आपण जेथे राहतो तेथे कोणी बेघर, बेसहारा, मनोरुग्ण, अनाथ, अपंग भेटल्यास त्यांना दोन घास देऊन त्यांचे पोट भरावे. चांगले कपडे देऊन आनंद द्यावा. गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करावी. फार मोठे नाही पण छोट्या छोट्या उपक्रमांनीही तरुण बदल समाजात घडवू शकतो, असे तो सांगतो. भीक नको, दया नको. हवी मायेची सद्भावना हा विचार जिवंत ठेवणारा अशोक काकडे म्हणूनच आज बेसहारा मनोरुग्णांचा आधार बनला आहे.

    मी झाकू आता कुठवर, उघडयावर पडले जगणे,

    मरणाचे उपाय लाखो, जगण्याला उत्तर नाही

    कपडयाच्या झाल्या चिंध्या, जखमांना अस्तर नाही

    मरणाचे उपाय लाखो, जगण्याला उत्तर नाही

    ही भावना असते बेसहारा असलेल्या अनाथ, अपंग, भिक्षेकरी यांची. ही माणसं काही आभाळातून पडलेली नसतात. तर कुणीतरी त्यांना जन्म दिलेला असतो. मग, तरीही ती अनाथ, बेसहारा का होतात? त्यांना असं रस्त्यावरच आयुष्य का जगावं लागतं? का त्यांना चार भिंतीचं घर मिळत नाही? का डोक्यावर छप्पर मिळत नाही? का त्यांना साधं पण चांगलं जेवण मिळत नाही? ते जवळ आले की का त्यांना आपण झिडकारतो? त्याचं जगणं आपण का अमान्य करतो? का त्यांना जगण्याचा अधिकार नाही? प्रश्‍न, प्रश्‍न आणि असंख्य प्रश्‍न… का आपण या प्रश्नांची उकल करत नाही? हा मुख्य प्रश्न.

    या आणि यासारख्या अशा प्रश्‍नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला बुलढाण्यातील अशोक काकडेने. ‘एक हात मदतीचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन तो या बेघर, बेसहारा, मनोरुग्ण, अनाथ, अपंगासाठी पुढे सरसावला. रस्त्यावरच्या त्या बेघर, बेसहारा बांधवाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सामान्य माणसासारखं जगण्यासाठी, त्यांना त्यांच्या हक्काचं घर देण्यासाठी त्यानं आपलं आयुष्य त्यांच्यासाठी झोकून दिलं. त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तो शोधू लागला आणि यातूनच जन्म झाला दिव्या फाऊंडेशनचा.

    एका घरात, कुटुंबात रहाताना भांड्याला भांड लागतं. कुरबुरी सुरु असतात, छोट्या मोठया कारणावरून भांडण होतात. थोडक्यात एकत्र कुटुंबात आपण घरातील सर्वच मंडळींना खुश ठेवू शकत नाही. पण, अशोकने तन, मन, धनानं एकत्रित येऊन आपण समाजाचं काही तरी देणं लागतो हा सेवाभाव अनेकांच्या मनात रुजवला. अनेक कुटुंबाना सोबत घेत, विविध जाती धर्मामधील तेढ कमी करत त्यांच्यासोबत दिव्या फाऊंडेशनची स्थापन केली.

    बुलडाणातील चिखली शहरात काही मनोरुग्ण रस्त्यावर फिरताना त्याला आढळले. त्या मनोरुग्णांना उपचार करून, त्यांच्या आरोग्यात सुधारणा करून समाजासमोर आणण्याचे काम अशोकने हाती घेतलं. सुरवातीला त्यांच्या छोट्या-छोट्या गरजा पूर्ण करून त्यांचा विश्वास प्राप्त केला. ते मनोरुग्ण त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागले. त्याला आपलं समजू लागले. त्या संवादाने किमया केली.

    रस्त्यावरील मनोरुग्णांना जेवण आणि कपडे देऊन भागणार नाही. त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होणं गरजेचं आहे. यासाठी त्यांचं हक्काचं घर असावं हे त्याला जाणवलं. यातुनच मनोरुग्ण, अनाथ, बेसहारा, अपंग बांधव यांच्यासाठी कायमस्वरुपी निवासी उपचार प्रकल्प सुरु करण्याचा विचार मनात आला. हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेकदा परिवाराला सोडून रात्री-अपरात्री बाहेर जावे लागले. मात्र, आपल्या व्रतापासून ती ढळला नाही. निमूटपणे काम करत राहिला. त्याचे फळ म्हणजे दिव्या फाउंडेशनची ओळख फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यातही झाली.

    महाराष्ट्रात चिखली, बुलढाणा, मुंबई, पुणे, नागपूर, कल्याण, औरंगाबाद, नाशिक, वाशिम, सांगली, कोल्हापूर, नांदेड, सातारा, रत्नागिरी आणि बाहेरील गुजरातमध्येही काकडेचे सेवा कार्य सुरू झाले. अनेक लोक दिव्या फाउंडेशनसोबत जुळले गेले. काही तरुणांना त्याने सोबत घेतलं. त्यांच्यात समाजसेवेची आग पेटविली. जे स्वेच्छेने आले ते सोबत राहिले आणि दिखावा करणारे आपसूकच बाजुला झाले.

    अशोकच्या कामाची चर्चा होऊ लागली. लोक सढळ हस्ते मदत करु लागले. कुणी धनाने तर कुणी मनाने.. यातूनच त्याने बुलडाणा शहरापासून 12 कि.मी. अंतरावर बोथा फॉरेस्टला लागून 1 एकर जमीन विकत घेतली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 3 जानेवारी 2021 ला ‘दिव्य सेवा’ प्रकल्पाचे भुमिपूजन केले. जागा होती पण, पुढील योजनेचे काय? प्रकल्पासाठी लागणार्‍या साहित्याचे काय? हा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळेस अनेक दाते पुढे आले. छोटे मोठे साहित्य जमा होऊ लागले आणि पहाता पहाता त्याच्या मनातील प्रकल्पाने प्रत्यक्ष आकार घेतला.

    आज, या प्रकल्पावर 26 लाभार्थी आहेत. अशोक त्या बेवारस बांधवासोबत स्वतः तिथे राहतो. नित्य नियमाने त्यांची सुश्रुषा करतो. त्या बेसहारा आता त्या प्रकल्पाचे खर्‍या अर्थाने वारस झाले. दोन वेळेचे पोटभर जेवण, कपडे, आरोग्य सुविधा, करमणूक सुविधा पुरविल्या जात आहेत. हा सर्व खर्च समाजातील दानशुर व्यक्तींच्या मदतीतून चालतो.

    निराधार मुलांची शैक्षणिक भूक भागविण्यासाठी अशोकने अनेक मुलांच्या शैक्षणिक गरजा पुर्ण केल्या. गरीब पालकांना मदतीचा हात दिला. लहान मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या नावे बँकेत ठेवी जमा करणे असे उपक्रम त्याने सुरु केले. आजमितीस वीसहून अधिक मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. जवळपास चार हजार विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाचे संपूर्ण जबाबदारी त्याने स्वीकारली आहे.

    गरीब आणि गरजूंना मदत करुन न थांबता ते आत्मनिर्भर व्हावेत यासाठी त्यांना आर्थिक साहाय्य त्यांच्या पायावर उभे करण्याचे बळ त्याने दिले. सेवा ही लोकचळवळ व्हावी हा विचार त्याच्या अंगात पुर्णतः भिनला आहे. समाजामध्ये बंधुता, समता नांदायला पाहिजे हा कृतिशील विचार सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत नेण्याचा त्याचा मानस आहे.

    अशोक काकडे
    दिव्या फाऊंडेशन, बुलढाणा
    भ्रमणध्वनी : 9260008002

    पुढील लेखात जाणून घेऊ एका दा… ता… बद्दल

    ना समाजाने त्याला ताई बनू दिलं ना दादा.

    एक तृतीयपंथी म्हणून आपलं जीवन तो जगत आहे. आपल्या वाट्याला लहानपणी जे भोग आले ते कुणा रस्त्यावरच्या पोराच्या वाट्याला येऊ नये यासाठी त्याने तब्बल पाच रस्त्यावरच्या शाळा सुरु केल्या आहेत.

     

    आनंद सागर
    सत्र दुसरे, लेख क्र 2.
    दिनांक : 9 ऑक्टोबर 2022
    लेखक : पत्रकार महेश पवार
    संपर्क : 9987269476