Pawar-Thackeray worried about winning the mini assembly seat

राजा आदाटे

विधानपरिषदेचा सामना संपला आता पुढे काय असेल याच्याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. आता मोकळे झालो असे राजकीय नेत्यांना आजिबात वाटत नाही. कारण, राज्यात लवकरच निवडणुकांचा महासंग्राम होणार आहे. निवडणुकीच्या जवळपास वर्षभर आधी उमेद्वार आणि मतदारसंघ हेरून ठेवणारे दोनच नेते राज्यात आहेत. एक तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि दुसरे म्हणजे शिवसेनेचे सध्याचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे. ते आता कामाला लागले आहेत. निवडणुकांपुर्वीची पुर्वतयारी आणि आघाडीचा सुसंवाद टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

आता एक वर्षाच्या आत निवडणुकीचा बंपर हंगाम सुरू होणार आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषदांच्या, १० महापालिका आणि २९६ पंचायत समिती या स्थानिक स्वराज निवडणुका वर्षभरात जाहीर करण्यात येतील.  मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या १० महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होतील. त्यासाठी २१ फेब्रुवार २०२२ च्या दरम्यान ही निवडणूक होणार आहे. त्या आसपास आणखी दोनमहापालिकांच्या निवडणुका होतील.

औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हापरिषदांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होईल. याला राजकिय वर्तूळात मिनीविधानसभेचा सामना असे संबोधले जाते. मग अशावेळी महाविकास आघाडीला एकत्रित निवडणूक लढणं शक्य आहे का? आणि शक्य असल्यास तिन्ही पक्षांना स्वतंत्ररित्या फायद्याचे ठरेल की तोट्याचे? याचे गणित मांडण्यास राजकिय चाणक्यांनी सुरूवात केली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ऑपरेशन लोटस आणि शत् प्रतिशत् भाजप हा भाजपचा नारा आहे. त्यामुळे या निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे भाजपकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. आता मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार, असा दावा भाजपचे नेते करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेवरील आपली सत्ता कायम राखण्याचे आव्हान असेल. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्ष एकत्र लढतील की नाही आणि भाजपला थोपवण्यासाठी सोबत राहतील का? असा प्रश्‍न आता निर्माण केला जात आहे.

खरे तर एकत्र लढताना जागावाटप आणि उमेदवार्‍या हा गुंतागुंतीचा प्रश्‍न असतो. शिवाय तोपर्यंत महाविकास आघाडीचा एकोपा टिकवणे हे आव्हान शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यासमोर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या साखळीतून एक जरी बाजूला गेला तरी भाजपनेते त्या संधीचा फायदा उठवतील आणि आघाडीच्या पदरात धोंडा येईल याची जाण या नेत्यांना बर्‍यापैकी आहे. त्याचीच व्युहरचना शरद पवार सध्या करत आहेत. या आघाडीत वळवळ करणारा आणि अडचणीचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. त्याचे काय करायचे हा प्रश्‍न मार्गी लावूनच पवार ठाकरे ही जोडी पुढे जाईल. कारण महाविकास आघाडीत राहिले तर काँग्रेस पक्षाचा फायदा आहे यात दुमत नाही. मात्र, आघाडी बाहेर गेलो तर आपला व्यक्तीगत फायदा होईल, लक्ष्मी दर्शन आणि स्वतःचे सत्ताकेंद्र टिकवणे असे पहाणारेही भरपूर नेते काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना कसे आवरायचे हा एक मोठ्ठा पेच महाविकास आघाडीसमोर राहणार आहे.

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एकत्रित लढून फायदा होण्याची शक्यता दिसत नाही. कारण राज्याच्या पातळीवर ज्या आघाड्या-युत्या होतात, ते स्थानिक पातळीवर लढाया या वॉर्डनिहाय असते. शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय महाविकास आघाडीतील पक्षांचीही स्वतंत्र ताकद आहे. एकमेकांना सामावून घेण्यात अडचणी येण्याचीच शक्यात अधिक आहे. असा तर्क हे नेते लढवून पक्षला बाजूला काढण्याचा प्रयत्न नक्कीच करतील याचा अंदाज पवारांना आहे.

आणखी एक मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाईल तो म्हणजे, एकत्र लढलेच तर बंडखोरांचे काय? बंडखोरांचा फटका बसेल. किंबहुना, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होईल, तर तिसरा गट हा बंडखोरांचा राहील कारण बंडखोर आपली ताकद सोडणार नाही. त्यामुळे निवडणूक दुरंगी ऐवजी तिरंगीच होईल. मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस दोनच मोठे पक्ष होते. मग आपल्या पक्षाच्या उमेदवारांना फटका बसेल असे सांगणारे काँग्रेसी चाणक्यही आहेत.

शहरानिहाय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची स्वतंत्र ताकद असली, तरी महाविकास आघाडीच्या एक फॉर्म्युला लक्षात आलाय की, तिन्ही पक्ष एकत्र आल्यास बंडखोरांचा त्रास होणार नाही. कारण, स्पर्धाच असमतोल होऊन जाते. तीन मोठे पक्ष एकत्र असणे ही महाविकास आघाडीची बंडखोरीच्या समस्येबाबत जमेची बाजू ठरणार आहे, महाराष्ट्रातील मुंबई-पुणे-नाशिका हा पट्टा तब्बल १०० विधानसभा जागांचा आहे. आगामी निवडणुकीसाठी या जागा खूप महत्त्वाच्या ठरतात.

२०१४ च्या निवडणुकी नंतर हा शहरी मतदार भाजपकडे गेला होता. त्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला आहे. या शहरी भागातील अर्बन व्होटर म्हणजे मध्यमवर्गीय मतदार त्याला भाजपने वळवण्यात यश मिळवले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप पूर्ण ताकद लावणार. त्यामुळे याच मुद्द्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येतील, महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना सामोरे गेल्यास या तिन्ही प्रमुख पक्षांची स्वतंत्ररित्या होणार्‍या पक्षवाढीचे काय? जागावाटपात काही जागांवर पाणी फेरावे लागेल, अशावेळी पक्ष कसा वाढेल, असे प्रश्नही उपस्थित केले जाणार आहेत.

पक्षवाढ हा मुद्दा येईल, तेव्हा प्रत्येक पक्ष जागांसाठी जोर लावेल, तर कुणाला तडजोड करावी लागणार. अशावेळी प्रतिष्ठेचा मुद्दा होऊ शकतो. अशावेळी स्थानिक पातळीवरचे नेते अशा प्रकारची आघाडी करण्यात अडथळा करतील. परंतू प्रत्येक प्रकारच्या आपत्तीचे व्यवस्थापन करण्यात पवार माहीर आहेत.

आगामी निवडणुकाही हे तिन्ही पक्ष एकत्रितच लढतील की नाही यावर अजित पवार यांनी उत्तर या निकालानंतर दिले आहे. माझे व्यक्तिगत मत आहे की, यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिथं दोन्ही पक्षाची ताकद आहे तिथे दोन्ही एकमेकांच्या विरूद्ध लढायचो आणि आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात लढून विरोधकांचं फावणार असले तर तिथे विरोधात लढायचो नाही. मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याशी बोलेन. जास्तीत जास्त एकत्र येऊन आघाडी करण्याचा प्रयत्न करू, असेही महाविकास आघाडीच्या आगामी वाटचालीबाबत अजित पवार म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, महाराष्ट्रात यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुसर्‍या कोणत्याच पक्षाला जागा राहणार नाही. या निवडणुकीत तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढले आणि हे त्याचेच यश आहे. तीन पक्षांचे झेंडे जरी वेगवेगळे असले तरी अजेंडा मात्र एकच आहे. तीनही पक्षांच्या प्रमुखांनी ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे, असेही परब म्हणाले आहेत. याचाच अर्थ सध्या तरी एकत्रित राहण्याची मानसिकता या तीन पक्षांनी केली आहे.

भाजप मात्र या निवडणुकीनंतर बॅकफूटवर जावून विचार करणार हे नक्की. आमच्या अपेक्षेनुसार हे निकाल निश्चितच नाहीत. भाजपच्या सर्व नेत्यांनी मेहनत घेतली. मात्र, आमची रणनीती कुठे चुकली असेल, तर तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर त्यांची शक्ती किती होईल, यासंदर्भात आकलनाची आमची चूक झाली. पण ही पहिली निवडणूक होती. आता अंदाज आलाय. पुढच्या निवडणुकीचा प्लॅन त्यानुसार तयार करू. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील सहा जागांचा निकाल लागल्यानंतर भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे वक्तव्य केले आहे.

आता या सर्व प्रतिक्रियांवरून एका बाब स्पष्ट होते आहे की, आगामी काळातल्या निवडणुकांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपसमोरील आव्हाने वाढत जातील, हे मात्र निश्चित, भाजप आणखी कोणता वेगळा डाव टाकते की जुळवलेले समिकरण ठामपणे पुढे रेटण्यात पवार ठाकरे यशस्वी होणार हे आता पहायला मिळणार आहे.