नरेंद्र मोदींची ‘सत्तरी’ आणि भाजपचं सेलिब्रेशन

मोदी हे चुंबकीय व्यक्तिमत्व आहेच. कितीही संकटे आली तरीही मोदींची भुरळ लोकांच्या मनावर कायम आहे आणि यालाच मोदीत्व म्हणायला हवे. मोदी जे सांगतात त्यावर लोकांचा कमालीचा विश्वास आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे आणि बाधितांचा आकडा कोटीच्या जवळ जात आहे. तर लक्षावधी लोक मरण पावत आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे, हे तर उघड आहे. आतापर्यंत इतक्या लोकांचा मृत्यू एखाद्या साथीच्या आजारात झाल्यावर लोकांनी संतापाने रान उठवायला हवे होते. परंतु लोकांचा जराही रोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाही. मोदींवर राजकीय विरोधक सोडले तर सामान्य जनतेतून राग व्यक्त होत नाही. वास्तविक, मोदींनी नोटबंदी आणली. जीएसटी लागू केला. यामुळे लोकांना नोटा बदलून घेताना त्रासही झाला. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना वाटत होते की, मोदी सरकार आता जाणार. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात मोदी कमी पडले होते. बेरोजगारी अफाट वाढली आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन तर दूरच,पण असलेल्यांच्या नोकऱ्याही गेल्या. अर्थव्यवस्था ढासळली. हे सारे मोदींमुळे झाले असे नाही. परंतु त्यांच्या राजवटीत झाले. तरीही मोदींमध्ये काहीतरी खास असे आहे की, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे अद्यापही आकर्षिले जातात.

मोदी हे चुंबकीय व्यक्तिमत्व आहेच. कितीही संकटे आली तरीही मोदींची भुरळ लोकांच्या मनावर कायम आहे आणि यालाच मोदीत्व म्हणायला हवे. मोदी जे सांगतात त्यावर लोकांचा कमालीचा विश्वास आहे. आजपर्यंत एवढा विश्वास आणि प्रेम कुणाही पंतप्रधानाला मिळालेले नाही. इंदिरा गांधींना तर शिव्याच खाव्या लागल्या. अटलबिहारी वाजपेयी यांना राजकीय विरोधकांकडून आपलेपणा मिळाला, परंतु त्यांना लोकांचे सार्वत्रिक प्रेम मिळाले नाही. वाजपेयी हे खरेतर गोडबोले पंतप्रधान होते. विरोधकांना गोड बोलून ते गुंडाळून टाकत असत. त्यामुळे त्यांना आदर मिळाला पण लोकप्रियता मिळाली नाही. लोकसभेत स्वबळावर भाजपच्या तीनशे तीन जागा मिळवण्याचा पराक्रम कुणाही नेत्याने एकहाती केलेला नाही, तो मोदींनी केला आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागा मिळाल्या, पण ती निव्वळ सहानुभूतीची लाट होती. नंतरच्या निवडणुकांत तिचा मागमूसही राहिला नाहि. त्यानंतर कधीच काँग्रेस एकाहाती विजय मिळवू शकलेली नाही. मोदी यांची लोकप्रियता आजही इतकी अफाट आहे की गेल्या लोकसभेला शिवसेनेचे खासदार केवळ मोदी लाटेवर तरंगले. शिवसेना आज हे मान्य करणार नाही. मोदी यांच्या इतक्या अफाट मोहिनीचे रहस्य कशात आहे, हे भल्याभल्या विचारवंतांना समजलेले नाहि.

मोदी हा एक ब्रँड आहे. खरेतर स्वतंत्र भारतात जन्मलेले मोदी हे देशाला लाभलेले पहिले पंतप्रधान आहेत. वाजपेयी हे अविवाहित होते तर मोदी यांचा विवाह नावालाच झाला होता. त्यामुळे अशा नेत्यांची लोकांना भीती वाटते. परंतु मोदी याही बाबतीत अपवाद ठरले. मोदी यांची राजकीय कारकिर्द देण्याची ही जागा नाही. परंतु मोदी यांना मिळालेल्या या अफाट यशाला एकप्रकारे काँग्रेसच जबाबदार आहे, असे म्हणता येईल. काँग्रेसने जितके अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले, तितके लोक मोदींकडे आकर्षिले गेले. भाजपमध्ये इतरही नेते आहेत. परंतु मोदींसारखे फायरब्रँड व्यक्तिमत्व असलेले कुणीच नाहि. टिना म्हणजे देअर इज नो अल्टरनेटिव्ह हा घटक मोदींइतका कुणालाही चपखल लागू होत नाहि. किंबहुना मोदींनी आज पंतप्रधान पदावर असलेल्या नेत्याबद्दलच्या अपेक्षांचे मानक इतके उंचावर नेऊन ठेवले आहे की इतर कुणीही नेता कितीही मोठा असला तरीही तो या मानकापुढे खुजाच वाटेल. मोदींनी नाट्यमय घोषणा करून सनसनाटी पद्धतीने निर्णय जाहिर करण्याची एक शैली विकसित केली आहे. साधेच निर्णय असतात,परंतु मोदींच्या मुखातून त्यांना सोन्याचे मोल प्राप्त होते. पुढे त्या घोषणांचे काय होते, याचा कुणीच पाठपुरावाही करत नाही. अगदी विरोधकही त्यांच्या मागे लागत नाहित.

मोदींच्या सुदैवाने त्यांच्या काळात विरोधकांकडे चांगले नेते राहिलेले नाहित आणि जे उरले आहेत ते गलितगात्र झाले आहेत. राहुल गांधी हे मोदींना कोणत्याच प्रकारे तोडीस तोड होऊ शकत नाहित. परंतु हे काँग्रेसला पटत नाहि. राहुल प्रमुख विरोधी नेते असतील तर मोदी कितीही काळ पंतप्रधानपदी राहू शकतात. सोनिया या सतत आजारीच असतात. शरद पवार यांना राज्यातील सरकार वाचवण्याची धडपड करावी लागते. केंद्रातील राजकारणात त्यांना लक्ष द्यायला सवड नाहि. देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करणारा नेता आज नाहि. आणि तशी आघाडी झाली तरीही मोदी ब्रँडपुढे तिचे काहीच चालणार नाहि, हे उत्तरप्रदेश निवडणुकीतून दाखवून दिले आहे. मोदी यांच्याबाबत असे बोलले जाते की आपल्या मंत्र्यांना ते अगदीच महत्व देत नाहित. इतर मंत्रालयांच्या घोषणाही ते स्वतःच करतात. ते प्रचंड अहंकारी आहेत, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगलेली असते. परंतु उघड बोलून कुणीही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत नाही.

एका ज्येष्ठ मंत्र्याने एकदा मोदी मंत्र्यांना बोलवून त्यांचा अपमान करतात, असा गौप्यस्फोटही केला होता. परंतु मोदींनी कितीही अहंकार दाखवला तरीही त्यांना एक माहित आहे. जोपर्यंत लोक त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत, तोपर्यंत त्यांना कुणीही हटवू शकत नाहि. मोदी यांच्यात खूप चांगले गुणही आहेत. न खाऊंगा, न खाने दूँगा ही घोषणा त्यांनी दिली होती. तिचे त्यांनी तंतोतंत पालन केले आहे. आजपर्यंत एकाही केंद्रिय मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा साधा शिंतोडाही उडालेला नाहि. लोकांना असले स्वच्छ सरकार पहाण्याची सवय नाहि. कारण काँग्रेसच्या राज्यात त्यांना रोज एका घोटाळ्याची बातमी वाचायची सवय झाली होती. त्यामुळे मोदींविरोधात कुणी काहीही म्हटले तरीही भ्रष्टाचाराचा आरोप मात्र शत्रुही करणार नाहि. राहुल यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणात तसे आरोप केले आणि हात पोळून घेतले. मोदींवर कितीही चर्चा केली, त्यांच्या लोकप्रियतेचे संशोधन केले, गणिते केली तरीही त्याच्याहीवर दशांगुळे मोदी उरतातच. मोदी मोहिनी ही अशी अगम्य आणि अनाकलनीय आहे.

                                                                                                                 

उमेश कुलकर्णी

umesh.wodehouse@gmail.com