sharad pawar

पवार यांनी महाराष्ट्राला नेहमीच फुले-शाहू-आंबेडकर यांचे राज्य संबोधले असले तरी त्यात प्रबोधनकार ठाकरे यांचाही वारसा होताच. पण ते शिल्पकार असलेल्या महाविकास आघाडीत शिवसेनाही समाविष्ट असल्याने त्या आघाडीला त्या चारही महापुरुषांचा वारसा आता लाभला आहे.

दिवाकर शेजवळ

शरद पवार यांच्याशी राजकारणावरून कोणाचे कितीही मतभेद आणि राग-रोष असले तरीही मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या कठीण कामगिरीत त्यांनी दाखवलेली धमक कुणीही अमान्य करणार नाही. त्यांनी ते काम अतिशय कल्पकतेने आणि टोकाची व्यूहरचना आखून १९९४ सालात फत्ते केले. नामविस्ताराच्या गोंडस नावाखाली तो प्रश्न निकालात काढण्यासाठी पवार यांनी दिवसही ‘तिळगुळ वाटपा’ चा (१४ जानेवारी १९९४) निवडला होता.यातच सारे काही आले. अन्य कुणाही मुख्यमंत्र्याने राजकीय नुकसानीची तमा न बाळगता तसे जोखमीचे पाऊल उचलण्याचे धाडस त्यापूर्वी केले नव्हते आणि भविष्यातही कुठल्याच मुख्यमंत्र्याने केले नसते.

१९९० सालात पवार यांनीं राज्यात फॅसिस्ट शक्तींना रोखण्याचा संकल्प करून काँग्रेस- रिपब्लिकन युती घडवत भाजप-शिवसेना युतीला सत्तेवर येण्यापासून रोखले होते. अन शिवसेनेचे विधानसभेचे ‘एकच लक्ष्य’ही चुकवले होते. आता त्याच पवार यांनी ३० वर्षांनी राज्यात १०५ जागा जिंकूनही भाजपला केवळ सत्तेतून हद्दपारच केले नाही, तर एकाकीही पाडले आहे. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी उभी करून त्या पक्षांना सत्ताधारी बनवले आहे.

पवार यांनी महाराष्ट्राला नेहमीच फुले-शाहू-आंबेडकर यांचे राज्य संबोधले असले तरी त्यात प्रबोधनकार ठाकरे यांचाही वारसा होताच. पण ते शिल्पकार असलेल्या महाविकास आघाडीत शिवसेनाही समाविष्ट असल्याने त्या आघाडीला त्या चारही महापुरुषांचा वारसा आता लाभला आहे. त्या पार्श्वभूमीवर, पुढील काळात पवार यांच्याकडून विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्राच्याच मोठया अपेक्षा राहतील.

पवार यांनी राज्यात घडवलेल्या सत्ता परिवर्तनात येथील दलित,बौद्ध, मागास, ओबीसी,आदिवासी समाजातील पक्ष- संघटना आणि डाव्या, पुरोगामी पक्ष, संघटनांना भलेही स्थान उरले नसेल; पण त्यांना पवार यांच्याविषयी फार पूर्वीपासून कायम आपुलकी वाटत आली आहे. कर्तबगारीच्या बाबतीत पवार यांचे आश्वासक नेतृत्व एवढेच कारण त्यामागे नाही. त्याचे खरे आणि मोठे कारण वेगळे आहे. ते आरपार काँग्रेसमन आहेत,हे वादातीत आहे. पण त्यांची जडणघडण ज्या मुशीत झाली, ती मुस मात्र वेगळी होती. काँग्रेसची तर मुळीच नव्हती.

आज मान शरद पवार यांचा ८० वा वाढ दिवस. त्यानिमित्ताने त्यांना दिर्घआयुरोग्य लाभो, यासाठी भरभरून शुभेच्छा!