तळेगाव – दाभाडे , लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी कालावधी लागणार आहे. त्यासाठी मुदत समाप्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

    • प्रशासकपदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

    पिंपरी : कोरोनामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. ६ जानेवारी २०२२ रोजी मुदत संपणाऱ्या तळेगाव नगरपरिषदेवर प्रांताधिकारी संदेश शिर्के यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, लोणावळा नगरपरिषदेवर मुख्याधिकाऱ्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी पारित केले आहेत.

    कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी कालावधी लागणार आहे. त्यासाठी मुदत समाप्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसिलदार, मुख्याधिकारी यांची नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    नगरपरिषदा, नगरपंचायतींची मुदत संपताच संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांच्या नावाने आदेश काढावेत. अधिकाऱ्यांना प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारण्याबाबत सूचित करावे. अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही सूचित करावे असे आदेश नगर विकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
    तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सदस्यांचा कार्यकाल ६ जानेवारी २२ रोजी संपुष्टात येत आहे. ६ जानेवारीपासून नगरपरिषदेची सर्व सूत्रे प्रांत संदेश शिर्के यांच्याकडे जाणार आहेत. तर, लोणावळा नगरपरिषदेची मुदत १० जानेवारी २२ रोजी संपुष्टात येत आहे. तेथील मुख्याधिकाऱ्यांचीच प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या बारामती, दौंड, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड, शिरुर नगरपरिषदांवरही प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.