जिल्हा बँकेवर झेंडा राष्ट्रवादीचाच पण चार जागांवर नामुष्की ; शेखर गोरे व सुनील खत्री यांना चिठ्ठीचा कौल

नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी आणि नव्वद कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली . अकरा टेबलावर प्रत्येकी पाच कर्मचारी अशी यंत्रणा तैनात होती . जावली कृषी पतपुरवठा मतदारसंघाचा पहिलाच निकाल धक्कादायक ठरला .

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी धक्कादायक निकालांची नोंद झाली . राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार शशिकांत शिंदे यांना सोसायटी मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला . कराड सोसायटीच्या लढतीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी मंत्री स्व विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा आठ मतांनी पराभव केला . तर जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात ज्ञानदेव रांजणे यांनी एक मतांनी धक्कादायक रित्या शिंदे यांचा पराभव केला . खटाव व कोरेगाव मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नंदू मोरे व शिवाजी महाडिक हे उमेदवार समान मते मिळूनही कमनशिबी ठरले . या दोन मतदारसंघाचा निकाल चिठ्टीवर जाऊन शिवसेनेचे शेखर गोरे व सुनील खत्री यांची जिल्हा बँकेत एण्ट्री झाली .नागरी बँकेतून रामराव लेंभे तर इतर मागास प्रवर्गातून प्रदीप विधाते विजयी झाले . विधाते यांनी शेखर गोरे यांचा पराभव केला महिला प्रतिनिधी राखीव मधून ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे यांची जिल्हा बँकेत एण्ट्री झाली .

    नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी आणि नव्वद कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली . अकरा टेबलावर प्रत्येकी पाच कर्मचारी अशी यंत्रणा तैनात होती . जावली कृषी पतपुरवठा मतदारसंघाचा पहिलाच निकाल धक्कादायक ठरला . राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव केला . एकूण 49 पैकी रांजणे यांना 25 तर शिंदे यांना 24 मते पडली . कराड सोसापटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह पाटील यांचा मतांनी पराभव केला .एकूण 140 मतांपैकी पाटील यांना 74 तर उंडाळकर यांना 66 मते मिळाली . खटावमध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीचे बंडखोर प्रभाकर घार्गे यांनी सहकार पॅनेलच्या नंदू मोरे यांचा दहा मतांनी पराभव केला .एकूण 103 मतांपैकी घार्गे यांना 56 तर मोरे यांना 46 मते पडली . पाटणमध्ये राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकर यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 14मतांनी पराभव केला . पाटणकर यांना 58 तर देसाई यांना 44 मते मिळाली . इतर मागास प्रवर्गात राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते 1459 मते मिळवून विजयी झाले . त्यांनी शेखर गोरे यांचा 1080 मतांनी पराभव केला . गोरे यांना एकूण 1838 पैकी 379 मते मिळाली . माण व कोरेगाव यांचा निकाल मात्र चिठ्ठीवर लागला . माणमध्ये शेखर गोरे व मनोज पोळ यांना सोसायटी मतदारसंघात 45 तर कोरेगावमध्ये सुनील खत्री व शिवाजीराव महाडिक यांना समान 36 मते मिळाली . निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी एका छोटया मुलीला समक्ष चिठ्ठी उचलायला लावली चिठ्ठीचा कौल मात्र शेखर गोरे व सुनील खत्री यांच्या बाजूने लागला . महिला राखीव मतदार संघात अपेक्षेप्रमाणे ऋतुजा पाटील 1445 तर कांचन साळुंखे 1292 मतांद्वारे बँकेत निवडून गेल्या .पराभूत उमेदवार शारदा देवी कदम यांना 618 तर चंद्रभागा काटकर यांना 141 मते मिळाली .नागरी बँक मतदार संघात राष्ट्रवादीचे रामराव लेंभे यांना 307 मते तर सुनील जाधव यांना 47 मते मिळाली . जिल्हा बँकेत 13 जागांवर राष्ट्रवादीने झेंडा लावला तरी माण कोरेगाव खटाव व जावली या चार जागांवर राष्ट्रवादीला मोठा दणका बसला आहे . भाजप ने 6 जागांद्वारे प्राबल्य निर्माण केले असून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली सोसायटी मतदारसंघातील पकड दाखवून दिली आहे . शेखर गोरे यांच्या रूपाने शिवसेनेची जिल्हा बँकेत एण्ट्री झाली आहे .