मराठी पाट्यांवरून मनसे आणि शिवसेनेत रंगतोय श्रेयवादाचा मुद्दा, यापा-यांवरही दबावातंत्र!

मराठीत पाट्यांना मुंबई ट्रेडर्स संघटनेच्या अध्यक्षांनी विरोध केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला की सर्व व्यापाऱ्यांचा याला विरोध नाही, बोटावर मोजता येणारे काही आहेत, जे जाणीवपूर्वक याला विरोध करत आहेत.

    मुंबई –  राज्यात मराठी भाषेत दुकानांचे फलक लावण्यावरून मनसे आणि शिवसेनेत श्रेयवादाचा मुद्दा रंगला असतानाच ही मराठी सक्ती करण्याबाबत मात्र दोन्ही पक्षांनी व्यापा-यांवर आपापल्या पध्दतीने दबावाची खेळी सुरू केली आहे. महाराष्ट्रात राहायचे आहे, हे विसरू नका’ असा इशारा शिवसेनेचा दिला आहे. तर पाट्या लावण्याचा खर्च जास्त की फुटलेल्या काचांचा जास्त असा सवाल विचारत मनसेने खळ्ऴ खट्याकचा गर्भीत इशारा दिला आहे. दरम्यान मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. तर निवडणूका समोर दिसताच असे मुद्दे आठवतात का? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

    नामफलकावर इतर भाषेची गरजच काय?
    मराठी पाट्यांच्या मुद्यावर आक्रमक होत मुंबईत, महाराष्ट्रात राहायचे आहे हे विसरू नका अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना दम भरला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांसाठी माझ्या महाराष्ट्र मनसैनिकांनी आंदोलने केली होती त्यामुळे हे त्यांचे श्रेय लाटण्याचा आचरटपणा कुणी करू नये. असा इशारा पत्रातून दिला आहे. मराठी भाषेशिवाय नामफलकावर इतर भाषेची गरजच काय? असा सवालही त्यांनी विचारला आहे. दरम्यान मनसेने शिवसेनेचे एक पाऊल पुढे जात पाटीचा खर्च जास्त की काचेचा? असा सवाल मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना केला आहे.

    फुटलेल्या काचा बदलण्याचा खर्च अधिक की पाट्यांचा
    मराठीत पाट्यांना मुंबई ट्रेडर्स संघटनेच्या अध्यक्षांनी विरोध केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला की सर्व व्यापाऱ्यांचा याला विरोध नाही, बोटावर मोजता येणारे काही आहेत, जे जाणीवपूर्वक याला विरोध करत आहेत. त्यांना इतकेच सांगायचे आहे की तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्राच्या सुख-सुविधा वापरता त्यामुळे इथे तुम्ही मराठी भाषेला विरोध करु शकत नाही, देशपांडे यानी गर्भित इशारा देताना सांगितले की, दुकानाची पाटी बदलण्याचा खर्च अधिक आहे की, दुकानाच्या फुटलेल्या काचा बदलण्याचा खर्च अधिक आहे. याचा विचार विरोध करायच्या आधी जरुर करावा.