पाकविरोधात विराटचा दबदबा! टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध नाबाद; १३०चा स्ट्राइक रेटनं धावांचा रतीब

  मुंबई : टी-२० विश्वचषकला सुरुवात झाली आहे, मात्र जगभरातील चाहत्यांच्या नजरा आहेत, त्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी खेळल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या सामन्यावर. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध अजूनपर्यंत दमदार आणि मजबूत रेकॉर्ड आहे. पाकविरोध कोहली, कोहली राहत नसून, तो विराट रूप धारण करतो. आकडेवारीवरुन हे समोर येत आहे. पाकविरोधातील तीनही सामन्यात कोहली नाबादविराट कोहलीने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकूण तीन सामने खेळले आहेत, आणि प्रत्येक वेळी बाहेर न पडता मैदानातून परतला आहे. म्हणजेच तीनही सामन्यांमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना एकदाही विराटची विकेट घेता आली नाही. या दरम्यान, भारतीय कर्णधाराने तीन डावांमध्ये १३० च्या शानदार स्ट्राईक रेटसह एकूण १६९ धावा केल्या आणि त्याच्या बॅटने दोन अर्धशतके देखील केली.

  पाकिस्तानविरुद्ध बॅट चांगलीच तळपते

  फक्त टी-२० विश्वचषकच नाही तर एकूणच विराटचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम अतुलनीय आणि शानदार आहे. त्याने भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ६ टी-२० सामने खेळले आहेत आणि ८४.६६ च्या सरासरीने २५४ धावा केल्या आहेत. या दरम्यान, कोहलीने ६ डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा तीन वेळा केल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे श्रीलंकेनंतर (८४.७५), पाकिस्तान हा एकमेव संघ आहे ज्याच्या विरुद्ध कोहली ८० पेक्षा अधिक सरासरीने धावा करतो.

  पाकिस्तानने सावध राहण्याची गरज

  विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध किती आक्रमक फलंदाजी करतो हे ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते. अशा स्थितीत २४ ऑक्टोबर रोजी बाबर आझम आणि त्याच्या कंपनीला विराटबाबत सावध राहण्याची पूर्ण गरज असेल. त्यामुळं विराट कसं लवकराच लवकर बाद करता येईल याची सुद्धा पाकिस्तान मोर्चेबांधणी करत असेल.

  कर्णधार म्हणून शेवटचे मिशन

  टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने स्पष्ट केले होते की, या स्पर्धेनंतर तो टी-२० स्वरूपातील कर्णधारपद सोडणार आहे. अशा परिस्थितीत कोहली निश्चितपणे या विश्वचषकात चांगली कामगिरी करून स्पर्धा स्वतःसाठी संस्मरणीय करण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल, या स्पर्धेनंतर विराटच्या जागा हिटमॅन रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभळणार आहे.