माती आणि बुक्का : अनुभवावी जीवनव्रताची वारी

बाहेर कोरोना होता, मात्र आपल्याला वारीला जाता येत नाही, याची खंत अनेकांना लागून राहिलेली होती. प्रस्थानाच्या दिवशी देहू, आळंदीत मानकरी वगळता इतर कोणत्याही सामान्य वारकऱ्यांना प्रवेश नव्हता. काही वारकऱ्यांनी कोरोनाचा धोका स्वीकारुन आळंदी व देहूला हजर राहण्याचे ठरविले. कसेबसे ते चालत देहूला प्रस्थानाला पोहचले, मात्र प्रशासनाने त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही.

सचिन पवार

वारी ही एक साधना आहे. या साधनेत काहीही झालं तरी खंड पडू द्यायचा नाही. हा प्रत्येक वारकऱ्याचा शिरस्ता आणि त्याचं कायम तंतोतंत पालन करणं हेच प्रत्येकाच्या ठायी. यासाठी मग जिवाचं रान करायलाही ते मागेपुढे पहात नाही. कारण, त्यांना आस लागलेली असते ती त्याच्या विठ्ठल रखुमाईची. पण, काळच असा आलाय की, एवढा आटापिटा करूनही काहींना ते शक्य झालं नाही कारण कोरोनाने सगळ्यावर पोचारा फिरवलाय.

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची आत्मखूण आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोक हे वारीची उपासना करतात. वारी ही महाराष्ट्राची महाउपासना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावांहून किमान एकजण तरी पायी वारीला येतोच, म्हणून दुर्गाबाई भागवत यांनी महाराष्ट्राची व्याख्या करताना ‘ज्या राज्यात लोक पंढरीच्या वारीला जातात, त्या राज्याला महाराष्ट्र म्हटले जाते’, असे म्हटले आहे.

तिथीला कोणत्याही निमंत्रण-आमंत्रणाशिवाय लाखो लोक आळंदी-देहूला जमतात. संतांच्या पालख्या खांद्यावर घेऊन नाचत-गात पंढरीला जातात. देवाबरोबर संतांचा गजर करतात. यावर्षी कोरोनामुळे हे सारे पाहता-करता येण्याचे भाग्य आपल्या नशिबी आले नाही, याची अनेकांना खंत आहे.

मार्चमध्ये लागलेला लॉकडाऊन आषाढवारीच्या आत मोकळा होईल, असा सर्वांचा अंदाज होता. कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढत गेला आहे की, डिसेंबर संपत ला तरी अजूनही आपण यातून सावरलेलो नाही. जूनमध्ये थोडी मोकळीक मिळाली. ८ जूनला काही बाबी शिथिल झाल्या. पण वारी व्हावी, अशी परिस्थिती नव्हती. आळंदी, देहूमध्ये प्रस्थानाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुकोब्बारायांची आणि माऊलींची पालखी पंढरीला निघते, त्या दिवशी संचारबंदी होती, कडक नियमावली होती. वहानाने आळंदी, देहूत प्रवेश करणे शक्यच नव्हते.मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत संतांच्या पादुका निश्चित तिथीला पालखीत आणून ठेवल्या. प्रस्थानाचे उपचार पार पडले, पण आषाढ दशमीपर्यंत ती पालखी, त्या–त्या संतांच्या मंदिरातच होती.

बाहेर कोरोना होता, मात्र आपल्याला वारीला जाता येत नाही, याची खंत अनेकांना लागून राहिलेली होती. प्रस्थानाच्या दिवशी देहू, आळंदीत मानकरी वगळता इतर कोणत्याही सामान्य वारकऱ्यांना प्रवेश नव्हता. काही वारकऱ्यांनी कोरोनाचा धोका स्वीकारुन आळंदी व देहूला हजर राहण्याचे ठरविले. कसेबसे ते चालत देहूला प्रस्थानाला पोहचले, मात्र प्रशासनाने त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही. ते मंदिराबाहेरच भजन करत बसून राहिले. मास्क घातलेले, कपाळावर मोठा वारकरी गंध, फेटा, पताका आणि हतबलता, या अवस्थेत दोन वारकरी तुकोबारायांच्या देहुच्या मंदिराबाहेर बसलेले आहेत, असा एक फोटो या काळात खूपच व्हायरल झाला होता. माध्यमांच्या प्रतिनिधींनी हा फोटो काढला होता. तो एक फोटो वारकऱ्यांची मनोअवस्था सांगण्यास पुरेसा होता.

या फोटोतील वणवे महाराज हे महिन्याचे वारकरी आहेत. महिन्याचे वारकरी म्हणजे दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला पंढरीची,. वद्य एकादशीला आळंदीची वारी करणारे आहेत. देहुच्या प्रस्थानानंतर तुसऱ्या दिवशी ते आळंदीत आले. आळंदी ते देहू हे अंतर सुमारे २० किलोमीटर आहे. देहूच्या दुसऱ्या दिवशी आळंदीत प्रस्थान असते, परिस्थिती देहूसारखीच होती. निवडक मानकरी मंदिर परिसरात होते, महाद्वार बंद होते. काही वारकरी बाहेर होते. सामान्य परिस्थीतीत जो परिसर गर्दीने फुलून जातो, तो मंदिर परिसर शांत होता.
काही वारकरी पायी वारीसाठी आग्रही होते. ते प्रस्थानाच्या दिवशी ळंदीला, देहूला गेले. दरवर्षी ज्या तिथीला पायी वारी सुरु होते, त्या दिवशी ते चालत निघाले, ही सगळी संख्या दहा-बारा जणांची असेल.

फलटणजवळच्या एका छोट्याश्या खेड्यात राहणारा जालिंदर वाघमोडे हा तीस वर्षांचा तरुण, असाच आळंदीहून पंढरीकडे पायी चालत निघाला. गळ्यात वीणा, वारकरी वेष व डोक्यावर छोट्याश्या माऊलींच्या पादुका. जेव्हा दिवेघाटात एकटाच चालत निघालेला हा वारकरी आम्ही पाहिला, तेव्हा आवाक झालो. डोक्यावरील पादुका पाहून डोळ्यात पाणी आले. या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका असून, माऊलींच्या पादुका घेऊन मी पंढरीची वारी करतो आहे, अशी त्याची श्रद्धा होती.

दसवडकर महाराज यांनीही नेम पाळला. देहू, देहूतून आळंदी आणि आळंदीहून पायी चालत पंढरीच्या दिशेने पायी प्रवास सुरु झाला. पोलीस जिथपर्यंत नाहीत, थिथपर्यंत जायचे असा या सर्वांचा निर्धार होता. पंढरपूर जवळच्या वाडी कुरोली गावापर्यंत ही मंडळी पोहचली पण. पुढे जाणे शक्य नसल्याने गुरुपोर्णिमेपर्यंत ही मंडळी याच गावात राहिली. आषाढ वारीची सांगता ही आषाढी एकादशीला होत नाही. दशमीला वारकरी पंढरपुरात येतात, एकादशी ते पोर्णिमेपर्यंत पंढरपुरात थांबतात. पोर्णिमेला गोपाळपुऱ्यात काला होतो, आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरु होतो.

दसवडकर महाराज जेव्हा आळंदीहून पायी चालत निघाले तेव्हा रामभाऊ चोपदारांनी त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी देवू केली. वारकऱ्यांच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी हीच ज्ञानेश्वर महाराजांचे अक्षर स्वरुप आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी सोबत असताना पायी वारी करणे हे ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत वारी करण्यासारखेच आहे.

शेवगाववरुन शाम महाराज झिंजुर्के, देहूहून तुकोबांचे वंशज माणिक महाराज मोरे, कोल्हापूरहून वडगावकर स्वामी महाराज आदि वारकऱ्यांनी एरकएकट्याने आपल्या गावांहून पंढरीची वारी केली. या साऱ्यांमुळे यावर्षीची पंढरीची पायी वारीची पंरपरा खंडित झाली नाही, असे, म्हणावे लागेल. कोरोनाची भीती, पोलिसांची भीती, खाण्यापिण्याची कोणतीही सोय नाही, अशा काळात जिवावर उदार होऊन या साऱ्यांनी वारीचा नेम पूर्ण केला.

नाशिक जवळच्या गावातील एक वारकरी पंढरीला जाता येत नाही म्हणून आषाढी एकादशीपर्यंत घराबाहेर तंबू ठोकून राहिला. वारीमध्ये ज्या प्रमाणात भजन-किर्तन होते, त्याप्रमाणेच सारे उपचार, उपासना त्या तंबूतून पार पडल्य़ा. वारी हा साऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय होता.

कोरोनाच्या काळात आपल्या जीवनव्रताला कसा प्रतिसाद द्यायचा, हा मोठा प्रश्न होता. प्रत्येकाने आपापल्या पातळ्यांवर त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या या काळात साऱ्या संस्थानांनी खूप मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली. आळंदीच्या गोविंदमहाराज केंद्रे संस्थानाने सुमारे ४० दिवस अन्नदान केले. राममहाराज झिंजुर्के यांनी नगर जिल्ह्यातील अनेक वारकरी किर्तनकारांना मदत केली. फडकरी दिंडीकरी संघटनेने शासनाला भरीव आर्थिक सहकार्य केले. विविध वारकरी संघटना यावेळी शासन, प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तयार होत्या.