Why do you interfere in Priyanka's faith? There is no objection to becoming a Christian

काशीतील बाबा विश्‍वनाथ यांच्या दरबारात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दर्शन घेणे तसेच पूजा करण्यावर आक्षेप घेणारी याचिका उत्तरप्रदेशातील शिवपूर नरिबियदाई येथील रहिवासी ॲड. कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी न्यायालयात दाखल केली होती.

खरा धर्म व्यापक असतो. सर्वसमावेशकता हेच ख-या धर्माचे मुख्य तत्त्व असते. ‘जड़ चेतन जग जीव महं. सव्हीं राममय जानी’ असे संत तुलसीदासांनी म्हटलेले आहे. दगड आणि वृक्षांमध्ये ईश्वराची अनुभूती असते तर मग आस्थेने मंदिरात येणा-या व्यक्तीला का रोखले जातात? परमेश्‍वर हा कोणत्याही एकाचा नसतो तर तो सर्वांचा असतो. धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी परमेश्वराला संकुचित केले आहे. जर एखाद्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्यावर बंधने घालण्यात येत असेल तर ती सृष्टीनिर्मात्या परमेश्‍वराची अवहेलना ठरेल व तो मानवतेचा अपमानही आहे. जो कोणी परमेश्वराच्या दर्शनासाठी शुद्ध अंत:करणाने आणि श्रद्धेने येतो त्याला देवदर्शनापासून रोखणे चुकीचे आहे. काही लोकांना उगीचच परमेश्वराच्या दर्शनापासून रोखले जाते, इतकेच नव्हे तर विशिष्ट धर्माच्या व्यक्तीने देवदर्शन केले म्हणून न्यायालयाचे द्वारही ठोठावतात.

काशीतील बाबा विश्‍वनाथ यांच्या दरबारात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दर्शन घेणे तसेच पूजा करण्यावर आक्षेप घेणारी याचिका उत्तरप्रदेशातील शिवपूर नरिबियदाई येथील रहिवासी ॲड. कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी न्यायालयात दाखल केली होती. प्रियांका गांधी खिश्चन असून त्यांनी बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतल्यामुळे हिंदूंच्या दुखावल्या गेल्या आहेत, असे म्हटले आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असून बाबा विश्‍वनाथ सर्वांचे असून सर्वजण बाबा विश्‍वनाथांचे आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे. मंदिरात सर्व जाती-धर्माच्या लोकांना देवदर्शन करता येऊ शकते. जेव्हा प्रियांका गांधी मंदिरात बाबा विश्‍वनाथांचे दर्शन घेत होत्या तेवा मंदिरातील सर्व महंत आणि अधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रियांका गांधी यांनी बाबांचे दर्शन घेतले ही बाब चुकीची ठरविलेली नाही.

इंदिरा गांधी यांनाही जगन्नाथपुरी मंदिर प्रवेशापासून रोखले होते

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्या पारसी असल्याच्या कारणावरून जगन्नाथपुरी मंदिरात प्रवेश देण्यास रोखण्यात आले होते. तेथील पंड्यांनी त्यांना प्रवेशापासून रोखले होते. जन्माने इंदिरा गांधी जरी काश्मिरी ब्राम्हण होत्या, परंतु त्यांनी फिरोज गांधी या पारसी व्यक्तींशी विवाह केल्यामुळे त्या पारसी झालेल्या आहेत असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. तथापि इंदिरा गांधी यांची पारसी धर्माबाबत आस्था असल्याचे कुठलेच उदाहरण सापडत नाही. फिरोज गांधी यांच्याशी लग्न झाल्यानंतरही त्या तत्काळीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांच्या त्रिमूर्ती हाऊस’ या निवासस्थानी राहिल्या. फिरोज गांधी यांच्या कुटुंबीयासोबतही इंदिरा गांधी यांनी फारसा संबंध ठेवला नव्हता. पारसी व्यक्तीशी लग्न केल्यानंतरही इंदिरा गांधी यांची हिंदूधर्माप्रती प्रचंड आस्था होती. त्या विविध मंदिरात जाऊन दर्शन घेत होत्या. त्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घालत होत्या. प्रयागला जाऊन त्यांनी देवराहा बाबांचे आशीर्वादही मिळविले होते.

मंदिरात वेगवेगळे नियम असतात

नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश दिला जात नव्हता. याच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केले होते. जर कोणी श्रद्धापूर्वक मंदिरात देवदर्शनासाठी येत असेल तर त्यांना का रोखण्यात येत होते? अशा संकुचित प्रवृतीमुळे देश आणि समाजाचे नुकसान झालेले आहे. विश्‍वनाथ मंदिरात प्रियांका गांधींनी घेतलेले दर्शन न्यायालयाने योग्य ठरविले, परंतु अजूनही नाशिकच्या त्र्यंबकेश्‍वर मंदिरात मात्र केवळ हिंदूनाच प्रवेश देण्याबाबतचा बोर्ड लागलेला आहे. कोणत्याही आस्थेला बंधने असायला नको.