विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच? मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रस्तावाची तयारी

  मुंबई (MUMBAI) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका, नक्षल चकमकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेबाबत करावयाच्या तयारीसाठी लागणारा वेळ, विधान परिषद निवडणूक अश्या असंख्य कारणांमुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडले. नियोजित कार्यक्रमानुसार सात डिसेंबरला होवू घातलेले  अधिवेशन डिसेंबर अखेरीस मुंबईतच होण्याचे संकेत मिळत आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस संभाव्य चार पाच दिवसांच्या अधिवेशनासाठी तारखाचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्याला येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी घ्यावी लगणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

  भाजप आणि सत्ताधारी कॉंग्रेसचे नेते आग्रही
  हिवाळी अधिवेशन नागपूर कराराच्या बांधिलकीने प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला घेतले जात असते, मात्र सध्या कोरोनासाठी करावी लागणारी व्यापक व्यवस्था आणि मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेता हे अधिवेशन मुंबईतच होण्याची चिन्हे आहेत अशी या सूत्रांची माहिती आहे. अधिवेशन नागपूरलाच व्हावे भाजप आणि सत्ताधारी कॉंग्रेसचे नेते आग्रही आहेत. तर अधिवेशन मुंबईतच व्हावे असे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे. त्यासाठी कॉंग्रेसचे नेते जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आल्याबाबत लक्ष वेधत आहेत.  मात्र, घोषित तारखेनुसार अधिवेशनाला १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्यापही मंत्रालय पातळीवरून अधिवेशनाच्या तयारीसाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक होवू शकली नाही.

  निर्णय घेता येण्यासारखी स्थिती नाही
  तसेच अधिवेशनाच्या महिनाभर आधी नागपूरात करायच्या तयारीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी, कामांच्या निविदाना मंजूरी देण्यात आली नाही. त्यामुळे जेमतेम १५ दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्र्याच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर याबाबत निर्णय घेता येण्यासारखी स्थिती नाही असे या सूत्राचे मत आहे. त्यामुळे या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांचे मत अधिवेशन मुंबईत घ्यावे असे असल्याचे सांगण्यात येत आहे.

  राज्यपालांच्या अनुमतीसाठीचा सुधारीत प्रस्ताव
  त्याबाबत येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या तारखांबाबत राज्यपालांच्या अनुमतीसाठीचा सुधारीत प्रस्ताव ठेवतील. त्यावेळी अधिवेशन ३१ डिसेंबरपूर्वी मुंबईत घ्यावे लागणार असल्याच्या तातडीबाबतही लक्ष वेधले जाणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने संभाव्यत: हिवाळी अधिवेशन १४ ते २४ , १७ ते २६ , २० ते २९ डिसेंबर या कालावधीत घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला असल्याचे सागण्यात येत आहे.

  कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता
  मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापैकी एक कालावधी निश्चित झाल्यावर राज्यपालांच्या अनुमतीने कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. त्यात मुंबईत या हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत विरोधी पक्षांची सहमती देखील घ्यावी लागणार असल्याचे यासूत्रानी सांगितले. मागील वर्षी देखील हिवाळी अधिवेशन मुंबईतच घ्यावे लागले होते, तसेच यंदाही घेतल्यास नागपूर कराराचा भंग होण्याबाबतचा मुद्दा येवू शकतो त्याबाबत विरोधीपक्षांच्या सहमतीने मार्ग काढला जावू शकतो अशी माहिती या सूत्रानी दिली आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्यासाठी येणा-या अडचणीचे कारण देत आणि येत्या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात घेण्याचे मान्य करत मागील वर्षी प्रमाणे यावेळी देखील सरकार मार्ग काढेल असे या सूत्रांचे मत आहे.