आजच्या दिवसाची दमदार सुरुवात; पी.व्ही सिंधूने पहिला सामना जिंकला

सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत सिंधूने सेनियाला चुका करायला भाग पाडत गुणांची कमाई केली. जवळपास २८ मिनिटे चाललेल्या या लढतीचे दोन्ही गेम्स अगदी आरामात जिंकत सिंधूने आपले वर्चस्व आणि दर्जा सिद्ध केला आहे.

    टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या तिसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात भारतीय बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही सिंधूने केली आहे. सिंधूने महिला एकेरीच्या बॅडमिंटनच्या पहिल्या सामन्यात इस्रायलच्या सेनिया पॉलीकारपोवा हिच्यावर २१-७, २१-१० अशी मात करत आपला पहिला सामना जिंकला आहे. टोक्‍यो क्रीडाग्रामामध्ये आज भारतीयांसाठी अनेक सामन्यांची पर्वणी आहे. त्यात मेरी कॉम, पी व्ही सिंधू , जी साथियानसारखे स्टार खेळाडू मैदानात उतरत आपली चमकदार कामगिरी दाखवणार आहेत.

    पहिल्या लढतीत महिला एकेरीच्या सामन्यात वर्ल्ड चॅंपियन सिंधूने एकतर्फी सामना जिंकताना इस्रायलच्या सेनियाला निष्प्रभ केले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत सिंधूने सेनियाला चुका करायला भाग पाडत गुणांची कमाई केली. जवळपास २८ मिनिटे चाललेल्या या लढतीचे दोन्ही गेम्स अगदी आरामात जिंकत सिंधूने आपले वर्चस्व आणि दर्जा सिद्ध केला आहे. मूळची रशियात जन्मलेली सेनिया पॉलीकारपोव्हा इस्रायलमध्ये स्थायिक असून त्याच देशाकडून खेळताना तिने युरोपियन बॅडमिंटनमध्ये विविध विजेतेपदे मिळवली आहेत. भारतानं दुसर्‍या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या रौप्यपदकासह आपल्या पदकाचं खातं उघडलं.