वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक आणि गुणपद्धती जाहीर, भारताला पुन्हा एकदा जगज्जेता होण्याची सुवर्णसंधी ; कधी, कुठे आणि कोणत्या संघासोबत होणार सामने?

टीम इंडिया या पर्वात सहा देशांशी भिडणार आहे. यामध्ये सुरुवात इंग्लंडपासून होणार आहे. टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानांवर मालिका खेळायच्या आहेत.

  मुंबई :  आयसीसीने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचे (ICC WTC23) वेळापत्रक नुकतेच जाहीर केले असून भारताला पुन्हा एकदा जगज्जेता होण्याची संधी मिळणार आहे. आयसीसीने दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक आणि गुणपद्धती बुधवारी ट्विट करत जाहीर केली आहे.

  सामने कधी आणि कुठे होणार ?

  टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून त्याठिकाणी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना ४ ते ८ ऑगस्टच्या दरम्यान ट्रेंट ब्रिज या ठिकाणी होईल त्यानंतर १२ ते १६ ऑगस्टदरम्यान क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा सामना खेळवला जाईल.  त्याचप्रमाणे २५ ते २९ ऑगस्ट हेडिंग्ले येथे आणि २ ते ६ सप्टेंबर ओव्हलमध्ये तिसरा आणि चौथा सामना खेळवला जाईल, मालिकेतील अखेरचा सामना १० ते १४ सप्टेंबरदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येईल.

  अशी असेल ICC WTC 23 ची गुणपद्धती

  आयसीसीच्या नव्या नियमानुसार, आता प्रत्येक संघाला सामना जिंकल्यानंतर १२ गुण, सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना ४ गुण आणि सामना टाय झाल्यास दोन्ही संघांना ६ गुण अशी समान विभागणी होणार आहे. तसेच २ सामन्यांच्या मालिकेसाठी एकूण २४ गुण असतील, तर ३ सामन्यांच्या मालिकेसाठी ३६ गुण, ४ सामन्यांच्या मालिकेसाठी ४८ गुण आणि ५ सामन्यांच्या मालिकेसाठी ६० गुण असतील. याआधीच्या एडिशनमध्ये प्रत्येक मालिकेसाठी १२० गुण होते.

  टीम इंडिया कोणत्या संघासोबत भिडणार ?

  टीम इंडिया या पर्वात सहा देशांशी भिडणार आहे. यामध्ये सुरुवात इंग्लंडपासून होणार आहे. टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानांवर मालिका खेळायच्या आहेत. तर इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध परदेशात मालिका खेळायच्या आहेत.

  तुम्हाला क्रिकेटच्या दुसऱ्या पर्वाबद्दल आणि गुणपद्धतीबाबत काय वाटते ?, हे कमेंन्ट बॉक्समध्ये नक्की कळवा…