महिलांना क्रिकेट खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही, तर..,ऑस्ट्रेलियाचा तालिबान्यांना इशारा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगभरातील महिला क्रिकेटच्या विकासाला अत्यंत महत्त्व देते. खेळ सर्वांसाठीच आहे आणि महिलांनाही सर्व स्थरांवर खेळण्याचा समान अधिकार आहे, असे आम्ही मानतो.

    मेलबर्न –  यापूर्वीही महिलांसाठी क्रिकेट खेळणे आवश्यक नाही, असे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा उपाध्यक्ष अहमदुल्लाह वासिकने म्हटले होते. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानात महिलांना क्रिकेट खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही, तर आम्ही पुरुष संघासोबत पूर्वनियोजित कसोटी खेळणार नाही, असा स्पष्ट इशारा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी तालिबान्यांना दिला.

    ऑस्ट्रेलियाचे क्रीडा मंत्री रिचर्ड कोलबेक यांनीही याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे कारवाईची मागणी केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगभरातील महिला क्रिकेटच्या विकासाला अत्यंत महत्त्व देते. खेळ सर्वांसाठीच आहे आणि महिलांनाही सर्व स्थरांवर खेळण्याचा समान अधिकार आहे, असे आम्ही मानतो. अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर, लोक दहशतीखाली आहेत. अगदी क्रिकेटपटू राशिद खाननेही याबाबत ट्विट करून आपल्या लोकांना वाचविण्याचे आवाहन केले होते.