बीसीसीआयला मोठा दिलासा! आयपीएल २०२० साठी मिळाला नवा प्रायोजक

ड्रीम-११ ने २२२ कोटी रुपयांची बोली लावत मुख्य प्रायोजकत्व मिळवले. मात्र, तरीही जवळपास दीडशे कोटींचा तोटा होणार होता. परंतु अनअकादमी व क्रेड या अन्य दोन कंपन्यांनी सहप्रायोजकता देण्याचे निश्चिात केल्यामुळे बीसीसीआयला फायदा होणार आहे.

मुंबई :  आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून ड्रीम-११ने बीसीसीआयशी करार केला आहे. त्यामुळे आता विवो कंपनीशी बीसीसीआयने करार मोडल्यानंतर हा तोटा आता भरून निघणार आहे. ड्रीम-११ ने २२२ कोटी रुपयांची बोली लावत मुख्य प्रायोजकत्व मिळवले. मात्र, तरीही जवळपास दीडशे कोटींचा तोटा होणार होता. परंतु अनअकादमी व क्रेड या अन्य दोन कंपन्यांनी सहप्रायोजकता देण्याचे निश्चित केल्यामुळे बीसीसीआयला फायदा होणार आहे.

आता त्यांच्याकडून मिळणारी रक्कम व ड्रीम-११ शी झालेला करार यातून बीसीसीआयला ३०२ कोटी रुपये मिळणार आहेत.  विवो ही चिनी कंपनी असल्यामुळे बीसीसीआयने त्यांच्याशी असलेला करार संपुष्टात आणावा, यासाठी विविध स्तरांवरून दडपण टाकले जात होते. अखेर जनभावना लक्षात घेता बीसीसीआयने हा करार मोडला.

संयुक्त अरब अमिरातीत होत असलेल्या आयपीएलला मुख्य प्रायोजक मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचवेळी बीसीसीआयने बोलावलेल्या निवीदांमध्ये ड्रीम-११ या कंपनीने सर्वाधिक बोली लावून २२२ कोटींचा करार करत हक्क मिळवले आहे. त्यामुळे बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.