चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज होणार जुगलबंदी, आव्हानासाठी दोन्ही संघ सज्ज

चेन्नई सुपर किंग्जचा संघ तळाच्या स्थानावर विजयासाठी झगडणाऱ्या सनरायजर्स हैदराबादशी बुधवारी सामना करणार आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी बजावताना सलग चार सामने जिंकले.

    इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ तळाच्या स्थानावर विजयासाठी झगडणाऱ्या सनरायजर्स हैदराबादशी बुधवारी सामना करणार आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी बजावताना सलग चार सामने जिंकले.

    फिरोझशाह कोटला स्टेडियमवरही हीच विजयी अनुकूलता कायम राहील, अशी चेन्नईची अपेक्षा आहे. तीन वेळा ‘आयपीएल’ विजेत्या चेन्नईला गत हंगामात समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. परंतु अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नईने यंदा क्षमतेनुसार कामगिरी केली आहे.

    हैदराबादला पंजाब किंग्जविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला आहे. बाकी पाचपैकी चार सामने त्यांनी गमावले आहेत. हैदराबादची आघाडीची फळी दिमाखदार कामगिरी करीत आहे, पण मधली फळी अपेक्षेनुसार कामगिरी करीत नसल्याने हैदराबादचा संघ बऱ्याचदा अपयशी ठरला आहे