धोनी आयपीएल 2022 मध्ये खेळणार; सीएसकेच्या सीईओंचे संकेत

धोनी पूर्णपणे फिट आहे. तो आणखी किमान एक ते दोन वर्षे सीएसकेकडून खेळेल. त्याने निवृत्ती घेण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. आम्ही त्याच्या कामगिरीवर समाधानी आहोत. तो केवळ कर्णधारच नाही, तर अनुभवी मार्गदर्शक आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा संघाला नेहमी फायदा होतो. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे महत्त्वाचे आहे. तो उत्तम फिनिशर असून त्याने आजवर ती जबाबदारी पूर्ण केली आहे, असे विश्वनाथन यांनी स्पष्ट केले.

    चेन्नई : कोरोना विषाणूमुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध आता सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेची तयारी करत असतानाच सर्व संघाने आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नियोजन सुरू केले आहे. 2022 मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही?, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) काशी विश्वनाथन यांनी प्रतिक्रिया देताना पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत धोनी खेळेल, असे संकेत दिले आहेत.

    धोनी पूर्णपणे फिट आहे. तो आणखी किमान एक ते दोन वर्षे सीएसकेकडून खेळेल. त्याने निवृत्ती घेण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. आम्ही त्याच्या कामगिरीवर समाधानी आहोत. तो केवळ कर्णधारच नाही, तर अनुभवी मार्गदर्शक आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा संघाला नेहमी फायदा होतो. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे महत्त्वाचे आहे. तो उत्तम फिनिशर असून त्याने आजवर ती जबाबदारी पूर्ण केली आहे, असे विश्वनाथन यांनी स्पष्ट केले.

    … तर प्रशिक्षक होणार

    धोनी चेन्नईचा संघ कधीही सोडणार नाही. तो चेन्नईकडून खेळला नाही तर त्या संघाचा प्रशिक्षक होईल, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा स्पिनर ब्रॅड हॉगने केली आहे. धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचा पहिल्या सिझनपासून कॅप्टन आहे. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये टीमने तीन वेळा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. दरम्यान, पुढील आयपीएलमध्ये आणखी दोन संघ दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मेगा ऑक्शनदेखील होईल. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

    धोनी बुधवारी 40 वर्षांचा झाला. त्याने मागच्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो. धोनीचा फिटनेस आजही चांगला असला तरी त्याच्या बॅटींगमधील फॉर्म हा काळजीचा विषय आहे. त्यामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शननंतर आयपीएल खेळेल का? हा प्रश्न विचारला जात आहे.