धोनीचं क्रिकेटमधील योगदान अद्वितीय आणि प्रेरणादायी : शरद पवार

धोनीचं क्रिकेटमधील योगदान अद्वितीय आणि प्रेरणादायी आहे’. असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे महेंद्रसिंह धोनीच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई  – भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. काल शनिवारी माहीने आपल्या इन्टाग्राम पोस्टद्वारे आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना एक मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटविश्व, सेलिब्रिटी आणि दिग्गज राजकारणी यांकडून धोनीला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘धोनीचं क्रिकेटमधील योगदान अद्वितीय आणि प्रेरणादायी आहे’. असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे महेंद्रसिंह धोनीच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, “क्रिकेटच्या खेळाशी माझा दीर्घकाळ संबंध आहे. एम एस धोनीला कर्णधार म्हणून नेमताना मला खात्री होती की तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होईल. क्रिकेटमधील त्याचे योगदान अद्वितीय आणि प्रेरणादायक आहे आणि त्याचे विक्रम अनुकरणीय आहेत. माझ्या शुभेच्छा नेहमी त्याच्या बरोबर असतील.” 

दरम्यान, २००८ मध्ये महेंद्र सिंग धोनीला कसोटी टीमचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्यानंतर ३० डिसेंबर २०१४ रोजी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. आता २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.