लियोनेल मेस्सीचा बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय ?

चॅम्पिअन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिचकडून बार्सिलोनाचा २-८ असा पराभव झाल्यानंतर मेस्सीने हा निर्णय घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

लिस्बन : फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी ( Lionel Messi ) बार्सिलोना क्लब सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्याच आठवड्यात खेळण्यात आलेल्या चॅम्पिअन्स लीग फुटबॉल ( Champions League football ) स्पर्धेत बायर्न म्युनिचकडून बार्सिलोनाचा २-८ असा पराभव झाल्यानंतर मेस्सीने हा निर्णय घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीत बायर्न म्युनिककडून मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर मेस्सी बार्सिलोना संघावर प्रचंड संतापला असून आपल्या भवितव्याबाबत पुनर्विचार करणार असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्सिलोना क्लबने मेस्सीला क्लब सोडून न जाता क्लबमध्येच राहून त्याने आपली निवृत्तीची घोषणा करण्यासही सांगितलं आहे. मेस्सीच्या करारामध्ये ७०० दशलक्ष युरो (८२६ मिलियन डॉलर) खरेदीच्या कलमाचाही समावेश आहे. तसेच बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला करारबद्ध करण्यासाठी मँचेस्टर सिटीने जय्यत तयारी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

मेस्सीने क्लब सोडणार असल्याचे जाहीरपणे सांगितले नसले तरी संघव्यवस्थापनाच्या निर्णयांबाबत त्याने नाराजी व्यक्ते केल्याने आता यांचा काडीमोड होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.