एका मिनिटांमध्ये 432 बॉक्सिंगचे पंचेस मारून हर्षवर्धन खाडे या नववीत शिकणाऱ्या युवकाचा विश्वविक्रम

वयाच्या पाचव्या वर्षापासून हर्षवर्धनचे स्वप्न होते की जागतिक स्तरावर काहीतरी वेगळे करून दाखवायचे. ते स्वप्न हर्षवर्धनने एका मिनिटांमध्ये बॉक्सिंगचे 432 पंच मारून पूर्ण केले.

    कांदिवली मध्ये चाळीत राहणाऱ्या हर्षवर्धन खाडे या इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या मुलाने एका मिनिटांमध्ये तब्बल 432 बॉक्सिंगचे पंच मारुन एक जागतिक विक्रम केला आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडियाचे सीनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन खाडे आणि त्याचे प्रशिक्षक मनोज गौंड यांचा सर्टिफिकेट आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला.

    विश्वविक्रम करणाऱ्या हर्षवर्धन खाडेचे प्रशिक्षक मनोज गौंड 18 वर्षांहून अधिक काळापासून मुलांना विविध प्रकारचे कराटे, मार्शल आर्टचे प्रशिक्षण देतात. वयाच्या पाचव्या वर्षापासून हर्षवर्धनचे स्वप्न होते की जागतिक स्तरावर काहीतरी वेगळे करून दाखवायचे. ते स्वप्न हर्षवर्धनने एका मिनिटांमध्ये बॉक्सिंगचे 432 पंच मारून पूर्ण केले.

    वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया प्रत्येक व्यक्तीस मदत करण्यास वचनबद्ध आहे. ज्यात काहीतरी विलक्षण आणि आश्चर्यकारक करण्याची क्षमता आणि दृढ निश्चय आहे. अशाच इच्छुकांचा समावेश केला जातो आणि त्यांची वैशिष्ट्ये रेकॉर्डमध्ये रूपांतरित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

    आजच्या तरुणांनी आपला अतीमौल्यवान वेळ मोबाइलवर गेम खेळण्यात किंवा सोशल मीडियावर विनाकारण टाइमपास करण्यात न घालवता हा वेळ आपल्यात लपलेल्या टॅलेंटला, सुप्तगुणांना आकार देण्यासाठी वापरावा आणि मुलांच्या पालकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे. तरच आजची पिढी ही आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्यात यशस्वी होईल, असे वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया सीनियर एज्युकेटर सुषमा नार्वेकर यांनी रेकॉर्ड होल्डर हर्षवर्धन यांच्या विक्रमानंतर म्हटले आहे.