IPL संपल्यानंतर मायदेशी कसा जाणार?, मॅक्सवेलने सांगितला प्लॅन…

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करणार नसल्याचं म्हटलं. यानंतर आता आरसीबीकडून खेळणार्‍या ग्लेन मॅक्सवेलने भारतातून मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियाला परतण्याचा प्लॅन सांगितला आहे.

    मुंबई : देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. वाढत्या संसर्गामुळे अनेक देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतात आयपीएलसाठी (IPL 2021) थांबलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परत कसं जायचं याचं कोडं पडलंय.

    मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लिनने आयपीएलनंतर खेळाडूंना परतण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खास विमानांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. मात्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करणार नसल्याचं म्हटलं. यानंतर आता आरसीबीकडून खेळणार्‍या ग्लेन मॅक्सवेलने भारतातून मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियाला परतण्याचा प्लॅन सांगितला आहे.

    मॅक्सवेलने द फाइनल वर्ड पॉडकास्टशी बोलताना सांगितले की, आम्हाला फक्त मायदेशी जाण्यासाठी मार्ग शोधायचा आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय आणि दोन्ही सरकार काम करू शकतात. आम्ही जर थोडं थांबलो तर असं घडू शकतं परंतु कशाही परिस्थितीत घरी परतण्याचा मार्ग स्पष्ट झाला पाहिजे.