परिस्थिती नियंत्रणात आल्यास देशांतर्गत क्रिकेट सुरू

परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट सुरू करता यावे, यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या स्पर्धामध्ये खेळणारे खेळाडू आणि निगडित व्यक्तींचे आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच बीसीसीआय या सर्व बाबींवर सातत्याने निरीक्षण करीत आहे, असे सौरव गांगुलीने संलग्न संघटनांचे अध्यक्ष आणि सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशात दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे क्रिकेटमधील अनेक सामने रद्द करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर सुरक्षित वातावरणात देशांतर्गत क्रिकेट सुरू करता येईल, असे आश्वासन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे. देशात कोरोनाच्या साथीमुळे आयपीएल २०२० संयुक्त अरब अमिरात येथे होणार आहे. तसेच हा आयपीएलचा १३ हंगाम असून क्रिकेटप्रेमींना सुद्धा स्टेडिअममध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने कोणतीही तारीख निश्चित केलेली नसल्याचे सौरव गांगुलीने गुरुवारी राज्य संघटनांना पत्र पाठवून कळवले आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट सुरू करता यावे, यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या स्पर्धामध्ये खेळणारे खेळाडू आणि निगडित व्यक्तींचे आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच बीसीसीआय या सर्व बाबींवर सातत्याने निरीक्षण करीत आहे, असे सौरव गांगुलीने संलग्न संघटनांचे अध्यक्ष आणि सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

२०२१ च्या आगामी वर्षात भारतात इंग्लंडविरुद्ध मालिका होणार आहे. त्याचसोबतच पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आणि २०२३ मध्ये एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेचे भारत यजमानपद सांभाळणार आहे.