मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक

पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे. भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

    साइखोम मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटातील महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशासाठी पहिल्या सर्वात मोठ्या पदकाची कमाई केली आहे. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 87 किलो वजन उंचावले तर 115 किलो वजन भार देखील उचलला. यासह तिने एकूण 202 किलो वजन उचलले. मीराबाई चानूच्या या विजयाने भारताच्या पदकाचे खाते उघडले आहे.

    वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनगटात चीनच्या जजिहूला सुवर्णपदक मिळालं आहे. मीराबाईनं भारताला मिळवून दिलेल्या पहिल्या पदकानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.

    पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे.  भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

    भारताकडून करनाम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकले होते. मल्लेश्वरीनं सिडनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. त्यानंतर 21 वर्षांनी चानूनं भारताची या खेळामधील प्रतीक्षा समाप्त केली आहे. रियो ऑलिम्पिकनंतर जवळपास प्रत्येक स्पर्धेत चानूनं मेडल जिंकले होते. यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्सचा समावेश आहे. त्याचबरोबर एशियन चॅम्पियनशिपमध्येही चानूनं ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.