टीम इंडियाने पराभवाचा बदला घेतलाच; इंग्लंडवर ७ गडी राखून केली मात, विराट-इशानची विजयी खेळी

टीम इंडियाने दुसऱ्या टी २० सामन्यात इंग्लंडवर ७ गडी राखून थेट विजयाला गवसणी घातली आहे.

    अहमदाबाद : टीम इंडियाने दुसऱ्या टी२० सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर ७ गडी राखून थेट विजयाला गवसणी घातली आहे. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य टीम इंडियाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७.५ षटकांत पूर्ण केले.

    कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणात मैदानात दाखल झालेला इशान किशन या दोघांनी विजयी खेळीला आकार दिला. कर्णधार विराट कोहलीने ४६ चेंडूत ७३ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय ईशान किशनने आपला पहिला सामना खेळत ३२ चेंडूत ५६ धावा केल्या.

    पदार्पणाच्या सामन्यातच इशान किशनचं तुफानी अर्धशतक

    भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन याने रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्या खेळीतच क्रीडारसिकांवर गारूड केलं. संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्याने निवड समितीचाही आब राखण्याचा उत्तम प्रयत्न त्याच्या खेळीतून सार्थकी लावला.

    इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी २० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन याने २८ चेंडूत दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार आणि षटकारांची बरसात करत त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. षटकाराच्याच सहाय्याने त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्याने एकूण 32 चेंडूत ५६ धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच वाहवा मिळवली.