आयपीएल मध्येही ‘वर्क फ्रॉम होम’?

कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर देशभरात टाळेबंदी (लॉकडाउन) लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. अद्यापही ही मुभा पूर्णपणे देण्यात आलेली नाही. काही प्रमाणात अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

मुंबई : कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर देशभरात टाळेबंदी (लॉकडाउन) लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. अद्यापही ही मुभा पूर्णपणे देण्यात आलेली नाही. काही प्रमाणात अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना घराघरात रूजली असून ती आता सवयीचा भाग झाली आहे. पण एखाद्या क्रिकेट सामन्यात ‘वर्क फ्रॉम होम’ असा पर्याय दिला तर… यंदाच्या आयपीएल स्पर्धेत असं केलं जाण्याची शक्यता आहे असं वृत्त पीटीआयने दिले आहे.

यंदाच्या आयपीएल मध्ये स्पर्धेचे ब्रॉडकास्टर असलेले स्टार स्पोर्ट्स हे समालोचकांना घरातून कॉमेंट्री करण्याचा पर्याय देणार असल्याची चर्चा आहे. ‘व्हर्च्युअल कॉमेंट्री’ म्हणजेच सामना एका ठिकाणी तर समालोचन विविध ठिकाणांहून अशी नवी संकल्पना आयपीएलसाठी राबविण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकतीच दक्षिण आफ्रिकेत टी३ सॉलिडारिटी कप स्पर्धा झाली. यात तीन संघ एकमेकांविरूद्ध खेळले आणि त्यात एबी डीव्हिलियर्सचा संघ विजेता ठरला. आफ्रिकेतील सेंच्युरियन पार्कवर सुरू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन भारतातील तीन समालोचकांनी केले.

 

आफ्रिकेतील या सामन्यासाठी इरफान पठाणने बडोद्याच्या घरून, दीप दासगुप्ता याने कोलकाताच्या घरून आणि संजय मांजरेकर यांनी मुंबईच्या घरून एकत्र धावते समालोचन केले. ही संपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे प्रमुख हे मैसून येथून वर्क फ्रॉम होम करत होते.  ३६ षटकांच्या आफ्रिकेतील सामन्यासाठी अशा पद्धतीने समालोचन करण्यात आलं. तीच पद्धत यंदाच्या IPLसाठी वापरण्याचा विचार ब्रॉडकास्टर करत आहेत. सुरूवातीच्या काळात हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीसाठी जर असं शक्य झालं नाही, तर स्थानिक भाषांमध्ये करण्यात येणाऱ्या समालोचनासाठी ही संकल्पना अंमलात आणली जाऊ शकते.