सचिनच्या अर्जुनचाही आयपीएलमध्ये समावेश ‘या’ टीमकडून खेळणार T20; किती लागली बोली माहितीये?

अर्जुन २०१८ साली भारताच्या अंडर-१९ टीमसाठी सहभागी झाला होता, पण सीनियर टीममध्ये येण्यासाठी त्याला दोन वर्ष प्रतिक्षा करावी लागली. या काळात अर्जुनने इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटमध्येही नशीब आजमावलं.

    चेन्नई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आयपीएलमध्ये समावेश झाला आहे. अर्जुनने यंदा प्रथमच आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. त्याला मुंबई इंडियन्सनं 20 लाखांना खरेदी केले आहे.

    अर्जुनने यंदा प्रथमच आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. अर्जुनने गेल्या महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली (Sayed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेतून सिनियर क्रिकेटमध्ये सहभाग घेतला. हरियाणाविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ची मुंबईच्या अंतिम-११ खेळाडूंमध्ये निवड झाली. अर्जुनला २०१८ साली भारताच्या अंडर-१९ टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली होतं, पण सीनियर टीममध्ये येण्यासाठी त्याला दोन वर्ष प्रतिक्षा करावी लागली. या काळात अर्जुनने इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटमध्येही नशीब आजमावलं.

    पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनला चकमदार कामगिरी करता आली नाही. या मॅचमध्ये त्याला अवघी एक विकेट मिळाली. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करत असताना अर्जुनने चैतन्य बिष्णोईला माघारी पाठवलं. अर्जुनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक आदित्य तरेने चैतन्य बिष्णोईचा झेल घेतला. या सामन्यात अर्जुन मुंबईचा सगळ्यात महागडा गोलंदाज ठरला. अर्जुनने ३ षटकात ३४ धावा दिल्या.

    अशी झाली निवड

    अर्जुननं ७३ व्या पोलीस निमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत (Police Invitation Shield Cricket Tournament 2020-2021) फक्त ३१ चेंडूत नाबाद ७७ धावांची आक्रमक खेळी केली. विशेष म्हणजे त्याने यावेळी एकाच षटकात पाच षटकार लगावले होते. त्यानंतर ४१ धावा देत तीन गडीही बाद केले.

    अर्जुनच्या या कामगिरीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने (MIG Cricket Club) इस्लाम जिमखान्याचा १९४ धावांनी दणदणीत पराभव केला. त्याची ही कामगिरीच आयपीएल फ्रेंचायझीचं लक्ष वेधून घेण्यासाठी निर्णायक ठरली आहे. २१ वर्षाच्या अर्जुनने त्याच्या खेळात पाच चौकार आणि आठ षटकार ठोकले होते. त्याने ऑफ स्पिनर हाशिर दाफेदारच्या एकाच षटकात पाच षटकार लगावले.