हिटमॅन रोहित शर्मासह ‘या’ चार जणांना खेलरत्न पुरस्कार जाहीर

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा याला सर्वोच्च क्रीडा सन्मान- राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे. खेलरत्न मानाचा पुरस्कार मिळवणारा रोहित शर्मा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितबरोबरच महिला कुस्तीपटू विनेश फोगट , महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थंगावेलू आणि हॉकीपटू राणी यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे. २०१६ नंतर प्रथमच या पुरस्कारासाठी ५ खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. दरम्यान या यादीतील मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं आहे.साक्षी आणि मीराबाई या दोघींना खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आधीच मिळाला आहे. त्यामुळं त्यांची नावं वगळून अर्जुन पुरस्कारांच्या यादीला केंद्र शासनानं मंजुरी दिली.यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, १३ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, २७ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले.