क्वालिफायर-2 मध्ये कोलकाताची दिल्लीशी लढत

बेंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात थाटात झाली. शुभमन गिल व व्यंकटेश अय्यर यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांवर दडपण आणले होते. मात्र, हे दोघेही स्थिरावल्यावर बाद झाले.

    शारजा – कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर (KKR Vs RCB) बेंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर कोलकाता संघाने क्वालिफायर 2 (Qualifier-2) गटातील सामन्यात प्रवेश केला असून आता अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) येत्या बुधवारी होणार आहे.

    बेंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात थाटात झाली. शुभमन गिल व व्यंकटेश अय्यर यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांवर दडपण आणले होते. मात्र, हे दोघेही स्थिरावल्यावर बाद झाले. गिल 29 तर, अय्यर 26 धावा काढून परतल्यानंतर भरात असलेला राहुल त्रिपाठी साफ अपयशी ठरला. यावेळी नितीश राणा व सुनील नरेन यांनी डाव सावरत संघाला शतकी मजल मारुन दिली.

    कर्णधार इयान मॉर्गन व शकिब अल हसन यांनी आणखी नुकसान न होऊ देता अखेरच्या षटकात आवश्‍यक असलेल्या 6 धावा काढल्या व संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना क्वालिफायर गटात प्रवेशही मिळवून दिला. बेंगळुरूकडून सिराज, पटेल व चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तत्पूर्वी सुनील नरेनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने बेंगळुरूला 20 षटकांत 7 बाद 138 धावा असे रोखले व अर्धी लढाई जिंकली.