मलिंगा यंदाच्या आयपीएलमधून बाहेर, मुंबई इंडियन्सला मोठा झटका

लसिथ मलिंगाने सुद्धा आपल्या वैयक्तिक कारणांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाला सांगितले. त्यामुळे तो श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबतच राहणार आहे. लसिथ मलिंगाने आयपीएल २०२० मधून माघार घेतल्यामुळे मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका बसणार आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२० च्या  (IPL 2020) खेळाडूंबाबत अनेक घडामोडी घडत आहेत. आयपीएल २०२० च्या तेराव्या हंगामाला आता थोडेच दिवस बाकी आहेत. परंतु आयपीएलमधील खेळाडू माघार घेण्याचा प्रकार सुरूच आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा वेगवान फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लसिथ मलिंगाने सुद्धा आपल्या वैयक्तिक कारणांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाला सांगितले. त्यामुळे तो श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबतच राहणार आहे. लसिथ मलिंगाने आयपीएल २०२० मधून माघार घेतल्यामुळे मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका बसणार आहे. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये मलिंगाची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळणार नाही.

लसिथ मलिंगाच्या जागी आता जेम्स पॅटिसनला (James Pattinson) संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी जेम्स पॅटीन्सन याचे संघात स्वागत केले. तसेच, मलिंगाला हवी ती मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.