रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुपुढे नव्या दमाच्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान, विजयपथावर परतण्यासाठी बेंगळूरुचा संघ उत्सुक

बेंगळूरुने सलग चार सामने जिंकून हंगामाला धडाक्यात प्रारंभ केला. परंतु चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा विजयरथ रोखला. दिल्लीने मात्र गेल्या तीन लढतींमध्ये अनुक्रमे पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांना धूळ चारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

    इंडियन प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी होणाऱ्या लढतीत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुपुढे नव्या दमाच्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे या लढतीत सरशी साधून पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी बेंगळूरुचा संघ उत्सुक आहे, तर दिल्ली मात्र विजयी घोडदौड राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

    बेंगळूरुने सलग चार सामने जिंकून हंगामाला धडाक्यात प्रारंभ केला. परंतु चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा विजयरथ रोखला. दिल्लीने मात्र गेल्या तीन लढतींमध्ये अनुक्रमे पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांना धूळ चारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

    एबी डीव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर अतिरिक्त दडपण आल्याचे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिसून आले. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या हर्षल पटेलसह (१५ बळी) अन्य गोलंदाजांना अधिक टिचून मारा करण्याची कला अवगत करावी लागेल.