नंबरवन टेनिसवीर अ‍ॅश्ले बार्टीची यूएस ओपनमधून माघार

ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टीने यंदाच्या यूएस ओपन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता नंबरवन टेनिसवीर अ‍ॅश्ले बार्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे. न्यूयॉर्कमध्ये ही स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. 

मी आणि माझ्या संघाने यंदाच्या वेस्टर्न आणि साऊथ ओपन, तसेच यूएस ओपन या दोन्ही स्पर्धांसाठी अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या संघाला आणि मला कोणताही धोका पत्करायचा नाही. परंतु यूएस टेनिस असोशिएशनला मी या स्पर्धेच्या आयोजनासाठी शुभेच्छा देते. पुढल्या वर्षी मी नक्की स्पर्धेत सहभागी होईन, असे बार्टीने हेराल्ड सनशी बोलताना सांगितले. दरम्यान, २०१९ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टीने मिळवले आहे.