पॅरिस सेंट जर्मेनची प्रथमच अंतिम फेरीत धडक

चॅम्पियन्स लीगमध्ये तब्बल ११० सामन्यांमध्ये खेळल्यानंतर पॅरिस सेंट जर्मेनचे अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले आहे.

पॅरिस सेंट जर्मेन या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आरबी लेपझिग या संघाचा ३-० असा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे पॅरिस सेंट जर्मेन या संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारली आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये तब्बल ११० सामन्यांमध्ये खेळल्यानंतर पॅरिस सेंट जर्मेनचे अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले आहे. सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवत पॅरिस सेंट जर्मेनने लेपझिगविरुद्ध सामना जिंकला आहे. 

मार्किन्होज, अँजेल डी मारिया तसेच हुआन बेर्नाट वेलास्को यांनी केलेल्या गोलमुळे पॅरिस सेंट जर्मेनने उपांत्य फेरीच्या लढतीवर वर्चस्व गाजवले. आता पॅरिस सेंट जर्मेनला रविवारी मध्यरात्री रंगणाऱ्या अंतिम फेरीत पाच वेळच्या विजेत्या बायर्न म्युनिक अथवा लिऑन यांच्यातील विजेत्याशी लढत द्यावी लागेल. जर पॅरिस सेंट जर्मेन या संघाने अंतिम फेरीत विजेतेपद मिळवले. तर मार्साइलनंतर चॅम्पियन्स लीग जिंकणारा हा फ्रान्समधील दुसरा क्लब ठरणार आहे.