कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या खेळाडूंना पोलिसांनी भरसामन्यातून उचलले! मेस्सी-नेमारपुढे गोंधळ

खेळाडू, प्रशिक्षक, फुटबॉल अधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांच्यात यावेळी बरीच चर्चा झाली. ब्राझीलच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, इंग्लंडमधून परतलेले अर्जेंटिनाचे तीन खेळाडू विलगीकरणात असायला हवे होते, पण ते सामना खेळत होते. विश्वचषक पात्रता फेरीसाठी सुरू असलेल्या या सामन्याचे आता पुढे काय करायचे, याचा निर्णय फिफाला घ्यावा लागणार आहे.

    साओ पावलो : ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक पात्रता सामन्यावेळी नाट्यमय घटना घडल्याने तो पुढे ढकलण्यात आला. कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या खेळाडूंना पकडण्यासाठी पोलिस आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना मैदानात धाव घ्यावी लागली. त्यांनी चार खेळाडूंना पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी पकडून नेले. यावेळी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमारही सामन्यात खेळत होते. दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत असताना सामना सातव्या मिनिटाला थांबवावा लागला.

    फिफाने केला सामना रद्द

    खेळाडू, प्रशिक्षक, फुटबॉल अधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांच्यात यावेळी बरीच चर्चा झाली. ब्राझीलच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, इंग्लंडमधून परतलेले अर्जेंटिनाचे तीन खेळाडू विलगीकरणात असायला हवे होते, पण ते सामना खेळत होते. विश्वचषक पात्रता फेरीसाठी सुरू असलेल्या या सामन्याचे आता पुढे काय करायचे, याचा निर्णय फिफाला घ्यावा लागणार आहे.

    ब्राझीलच्या आरोग्य संस्थेचे अध्यक्ष अँटोनियो बॅरा टोरेस यांनी सांगितले की, ब्राझीलचा कोरोना प्रोटोकॉल मोडल्याबद्दल अर्जेंटिनाच्या त्या सर्व खेळाडूंना दंड आकारून परत पाठवले जाईल. चौघांना क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास सांगितले गेले होते, पण त्यापैकी तिघे सामना खेळण्यासाठी मैदानात आले होते.

    एस्टन व्हिलाचा एमिलियानो मार्टिनेझ आणि एमिलियानो बुएंडिया आणि टोटेनहॅमचा जिओव्हानी लो सेल्सो आणि क्रिस्टियन रोमेरो हे प्रीमियर लीग खेळून इंग्लंडहून ब्राझीलला परतले होते. त्यांना दहा दिवस विलगीकरणात राहण्यास सांगितले होते, पण ते खेळण्यासाठी थेट मैदानात उतरले. ब्राझीलचे कोरोना प्रोटोकॉल कठोर असल्याने त्या खेळाडूंच्या अडचणीत भर पडली आहे.