पोलार्डचं वेगवान अर्धशतक आणि गगनचुंबी षटकार, आयपीएलपूर्वी वडीलांचं निधन अन् भर मैदानात हात जोडून केलं वडिलांना वंदन!

पोलार्डने अशक्य वाटणारी धावसंख्या आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर शक्य करुन दाखवली. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा ठोकत, चेन्नईचं २१९ धावांचे तगडे आव्हान शेवटच्या चेंडूवर पार केलं. पोलार्डने ६ फोर आणि ८ सिक्स ठोकले. 

  नवी दिल्ली :  मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात काल शनिवारी सामना खेळवण्यात आला. यामध्ये मुंबईने चेन्नईचा वादळी वाऱ्यासारखा धुव्वा उडवला आहे. मुंबईने चेन्नईवर ४ गडी राखत थरारक विजय मिळवला आहे. परंतु या सामन्यात आणि संपूर्ण आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यामध्ये खरा हिरो ठरला तो म्हणजे कायर पोलार्ड.

  पोलार्डने अशक्य वाटणारी धावसंख्या आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर शक्य करुन दाखवली. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा ठोकत, चेन्नईचं २१९ धावांचे तगडे आव्हान शेवटच्या चेंडूवर पार केलं. पोलार्डने ६ फोर आणि ८ सिक्स ठोकले.

  मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज सुद्धा बाद होण्याच्या मार्गावर होते. परंतु ऑलराऊंडर क्रुणाल पांड्याने फलंदाजाची धुरा सांभाळत कायर पोलार्डला उत्तम प्रकारे साथ दिली. त्यानंतर काहीच धावा तोंड्यावर असताना आणि भेदक मारा करण्यासाठी गेलेल्या क्रुणालची शक्ती थोड्यासाठी कमी पडली. त्यामुळे तो बाद झाला.

  क्रुणाल नंतर त्याचा भाऊ हार्दिक पांड्या मैदानात उतरला. परंतु ७ चेंडूत १६ धावा बनवत तोही बाद झाला. हार्दिकनंतर सामन्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलार्डवरती आली. पोलार्डने शांत आणि सावधपणाने झुंझावत चौकार आणि षटकार मारत मुंबईला ४ गडी राखत शानदार विजय मिळवून दिला.

  वडिलांना वंदन

  पोलार्डने आपलं हे अर्धशतक आपल्या पित्याला अर्पण केलं. काही आठवड्यांपूर्वीच पोलार्डचे वडील त्याला सोडून गेले. तुफानी खेळाडू पोलार्ड काही दिवसांपासून काहीसा हताश होता. यंदाच्या आयपीएलमध्ये पोलार्डला म्हणावा तसा फॉर्म सापडला नव्हता. मात्र चेन्नईसारख्या खतरनाक टीमविरुद्ध पोलार्डचा हात बसला आणि त्याने एक एक चेंडू थेट ढगात पाठवला. अर्धशतकानंतर पोलार्डने त्याच ढगाकडे पाहून हात जोडले आणि काही दिवसापूर्वी सोडून गेलेल्या आपल्या पित्याला भर मैदानातून वंदन केलं.