भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे माघारसत्र; ‘बीसीसीआय’ मात्र आयोजनावर ठाम

ऑस्ट्रेलियातील काही शहरांमध्ये कोणत्याही क्षणी टाळेबंदीची घोषणा होईल आणि आपण भारतातच अडकून बसू, या भीतीपोटी अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी मायदेशी जाणे पसंत केल्याने ‘आयपीएल’च्या संयोजकांचे धाबे दणाणले आहेत.

    इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर आता टीका होऊ लागली आहे. भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने कुटुंबातील सदस्य करोनाशी झुंजत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘आयपीएल’मधून माघार घेतली आहे. त्यातच ऑस्ट्रेलियातील काही शहरांमध्ये कोणत्याही क्षणी टाळेबंदीची घोषणा होईल आणि आपण भारतातच अडकून बसू, या भीतीपोटी अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी मायदेशी जाणे पसंत केल्याने ‘आयपीएल’च्या संयोजकांचे धाबे दणाणले आहेत.

    भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यानेही ‘आयपीएल’च्या आयोजनावर खरमरीत टीका केल्याने आता जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० लीगवर भयसावट निर्माण झाले आहे. बिंद्राप्रमाणेच क्रिकेटचाहत्यांचीही सारखीच अवस्था आहे. मात्र ज्यांना ‘आयपीएल’मध्ये खेळणे सुरक्षित वाटत नसेल, त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण ‘आयपीएल’चा खेळ सुरूच राहणार, अशी भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतली आहे.