thisara parera

श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने(thisara parera retirement from international cricket) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 

    श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने(thisara parera retirement from international cricket) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  थिसारा परेराने निवृत्तीची माहिती बोर्डाला दिली आहे. श्रीलंका क्रिकेटचे निवड करणारे लोक थिसारा परेरासह अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंना एकदिवसीय संघातून वगळणार असल्याचे वृत्त होते. या चर्चेनंतर परेराने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र परेरा फ्रेंचायझी क्रिकेट खेळणार आहे.

    श्रीलंकेच्या क्रिकेट निवड समितीने अलिकडेच घोषणा केली होती की, वनडे संघातून अनेक ज्येष्ठ खेळाडू वगळण्याचा त्यांचा विचार आहे. संघाला पुढे बांगलादेश आणि इंग्लंडचा दौरा करावा लागणार आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले, की निवडकर्त्यांना दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, सुरंगा लकमल आणि थिसारा परेरा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना आगामी मालिकेसाठी मर्यादित षटकांच्या संघात निवडण्याची इच्छा नाही. श्रीलंकेला बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय आणि इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे.

    २००९ मध्ये पदार्पण केल्यानंतर परेराने श्रीलंका संघाकडून ६ कसोटी, १६६ एकदिवसीय आणि ८४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परेराने ६ कसोटी सामन्यांमध्ये २०३ धावा केल्या आणि ११ बळी घेतले. त्याचबरोबर १६६ एकदिवसीय सामन्यात त्याने २३३८ धावा आणि १७५ बळी घेतले. ८४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात परेराने १२०४ धावा आणि ५१ बळी घेतले.

    आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत परेराने एक एकदिवसीय शतक झळकावले आहे. २०१९मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध माउंट माऊंनहाई येथे १४० धावांची खेळी केली.