‘चार पोळ्यांची भूक असेल, तर दोनच पोळ्या खा’, फिटनेसमुळेच बदल घडून येऊ शकतो; मिल्खा सिंग यांनी तरुणांना दिलेल्या काही फिटनेस टिप्स

मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा. चार पोळ्यांची भूक असेल, तर दोनच पोळ्या खा. पोट जितकं रिकामं राहील, तितके तुम्ही व्यवस्थित राहाल. सगळी आजारपणं पोटातूनच (Stomach) सुरू होतात, असं मी लोकांना कायम सांगायचो, असं मिल्खा सिंग यांनी सांगितलं होतं.

    नवी दिल्ली : भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण देशभरातून दु:ख व्यक्त केलं जातंय. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावणारे मिल्खा सिंग हे पहिले भारतीय ठरले होते.

    मिल्खा सिंग ९१ वर्षांचे होते पण या वयातही त्यांची फिटनेसबद्दल (Fitness) असलेली आवड आणि मेहनत यात किंचितही घट झाली नव्हती. त्यांना फिटनेसचं किती महत्त्व होतं आणि फिटनेस राखण्यासाठीचं त्यांचं रहस्य काय होतं, याबद्दल एका वृत्तपत्राने माहिती दिली आहे.

    फिटनेसचं महत्त्व कोणत्याही ॲथलीटसाठी (Athlete) अनन्यसाधारण असतं. प्रत्येक ॲथलीटने त्यासाठी स्वतःची अशी काही गणितं तयार केलेली असतात. त्यासाठीची बंधनं ते स्वतःहून काटेकोरपणे पाळतात. मिल्खा सिंगही त्याला अपवाद नव्हते. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या फिटनेसबद्दल सांगितलं होतं. फिटनेसमुळेच बदल घडून येऊ शकतो. मी या वयातही जो काही चालू-फिरू शकतो, ते केवळ शारीरिक फिटनेसमुळेच शक्य झालं आहे, असं ते म्हणाले होते.