आयपीएलच्या तेराव्या हंगामातून सुरेश रैनाची माघार

चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे वेगवान फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली असून त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : आयपीएल २०२० (IPL 2020) सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings)  संघातील एक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संघाचा दुबईतला क्वारंटाईन कालावधी वाढवण्यात आला. मात्र या संकटानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे वेगवान फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली असून त्याने भारतात परतण्याचा (Returned to India) निर्णय घेतला आहे.

काही वैयक्तिक कारणांसाठी (personal reasons) सुरेश रैनाने यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला असून आम्ही सुरेश रैना आणि त्याच्या परिवारासोबत आहोत अशी माहिती काशी विश्वनाथन यांनी दिली आहे. १५ ऑगस्ट रोजी धोनीसोबत सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच चेन्नईच्या संघासोबत तो २१ ऑगस्टलाच दुबईत आयपीएलसाठी दाखल झाला. परंतु रैनाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला असून संघाला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.