ऑलिम्पिकवरील कोरोनाचे सावट हटेना ; आता ‘या’ देशातील खेळाडूंना झाला कोरोनाचा संसर्ग

गेल्या काही दिवसांपासून जपानमधील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या ४ दिवसांपासून राजधानी टोकियामध्ये दरदिवशी हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. अनेक जण या खेळांना विरोध करत आहेत.

    जपान: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी ९० भारतीय खेळाडूंची एक तुकडी आज(१८ जुलै ) जपानमध्ये दाखल झाली असतानाच दुसरीकडे ऑलिम्पिकवरील कोरोनाचे संकट संपण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या यामुळे चिंता वाढली आहे.

    आतापर्यंत युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघामधील काहींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ऑलिम्पिकशी संबंधित एकूण १० कोरोनाचे रुग्ण रविवारी (१८ जुलै) आढळले. यात खेळाडू, मीडिया, कंत्राटदार आणि इतरांचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ शनिवारी केर्न्स येथील त्यांच्या प्री-गेम्स प्रशिक्षण शिबिरात त्यांच्या खोल्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आला. त्यानंतर या खेळाडूच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यात

    “कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत. पण, जर कोरोनाचा उद्रेक झालाच तर त्याला प्रतिसाद देण्याकरता आमच्याकडे दुसरी योजना असेल, अशी आम्ही खात्री करत आहोत.” असे खेळांचे प्रमुख सेईको हाशिमोटो यांनी म्हटले आहे.

    जपानमध्ये वाढतायत कोरोनाचे रुग्ण
    गेल्या काही दिवसांपासून जपानमधील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या ४ दिवसांपासून राजधानी टोकियामध्ये दरदिवशी हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. अनेक जण या खेळांना विरोध करत आहेत, कारण यामुळे कोरोनाचा मोठा उद्रेक होईल, अशी भीती त्यांच्या मनात आहे.

    भारतीय खेळाडू
    ९० भारतीय खेळाडूंची तुकडी टोकियोमध्ये पोहोचली असून यात तिरंदाजी आणि बॅडमिंटन संघाचा समावेश आहे.विमानतळावरील लांबलचक प्रक्रियेनंतर हे खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजकडे निघाले आहेत.