ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा ‘महासंघ’ निवडला जाणार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी तसेच मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी २३ ते २५ खेळाडूंचा भारतीय ‘महासंघ’ निवडला जाणार आहे.

नवी दिल्ली : गांधी, परांजपे आणि सिंग यांचा निवड समितीमधील कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची संघनिवड ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी तसेच मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी २३ ते २५ खेळाडूंचा भारतीय ‘महासंघ’ निवडला जाणार आहे.

सप्टेंबरमध्ये कार्यकाळ संपत असलेल्या देवांग गांधी, जतिन परांजपे आणि शरणदीप सिंग यांचा समावेश असलेली निवड समितीच भारताची संघनिवड करू शकते, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या काही सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील क्रिकेट अद्यापही ठप्प आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नव्या निवड समितीची नेमणूक करण्याऐवजी सध्याची समितीच संघनिवड करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच दौऱ्यादरम्यान एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण अथवा दुखापत झाल्यास अनेक पर्यायी खेळाडू उपलब्ध असावेत, म्हणून भारताच्या चमूत २३ ते २५ खेळाडूंचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.