12000 runners participated in Pune City Marathon; Punekar will run to help social workers

  पुणे : ‘द पूना क्लब लिमिडेट’ यांच्यातर्फे व सदर्न कमांड पुणे यांच्या सहकार्याने आयोजित ‘पुणे सिटी मॅरेथॉन’ स्पर्धेत १२००० धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा ३ मार्च रोजी होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा म्हणाले की, अशा प्रकारच्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेची संकल्पना क्लबच्या वतीने प्रथमच प्रत्यक्षात येणार असून, भविष्यात दरवर्षी ही स्पर्धा अधिकच भव्य आणि आगळ्या-वेगळ्या स्वरूपात आयोजित करण्यात येईल.
  मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
  दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टचे जहांगीर दोराबजी म्हणाले की, अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आम्ही प्रथमच करीत असलो तरी, सर्व शासकीय, सर्व प्रायोजक आणि संबंधिताकडून आम्हाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आणि अविश्वसनीय असाच आहे. भविष्यात यापेक्षाही अधिक चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आम्ही करीत आहोत.
  चांगल्या कारणासाठी समान व्यासपीठावर एकत्रित
  पूना क्लबचे उपाध्यक्ष गौरव गढोके म्हणाले की, या मॅरेथॉनमुळे समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिक एका चांगल्या कारणासाठी समान व्यासपीठावर एकत्रित येतील. तसेच, या स्पर्धेमुळे निश्चितच समाजाचे हित साधले जाईल.
  रुग्णांना सक्षम करत वृद्धाश्रम संस्थांना मदत
  शहरातील विविध भागांत वृक्षारोपण करणाऱ्या, वेश्याव्यवसाय करणाऱ्यांच्या मुलांना शिक्षण पुरविणाऱ्या, तसेच दृष्टिहीन व श्रवणदोष असलेल्या रुग्णांना सक्षम करत वृद्धाश्रम संस्थांना मदत करण्यासाठी अनेक पुणेकर रविवारी (ता. 3) धावणार आहेत. मॅरेथॉनच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम समाजासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच संस्थांना दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे रेस डायरेक्टर शैलेश रांका यांनी सांगितले.
  बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथून सुरुवात
  ही स्पर्धा 21 किमी., 10किमी., पाच किमी. आणि तीन किमी. अशा तीन प्रकारात होणार आहे. स्पर्धकांना 21किमी साठी बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथून सुरुवात होणार असून सदर्न कमांड मार्गे, मनोज पांडे एनक्लेव्ह, लष्कर पोलीस स्टेशन रोड, हायलँड इव्ह, परेड ग्राउंड रोड, मिल्खा सिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आर्मी कॅन्टीन, सदर्न कमांड सिंग्नल, घोरपडी बाजार पोस्ट ऑफिस, जेजे चेंबर्स, ए १ रोलर स्केटिंग रोड प्रॅक्टिस येथून पुन्हा पूना क्लब मैदान असा मार्ग पूर्ण करावयाचा आहे.
  दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निधी वितरित
  स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक व सहभागींना पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथून रविवारी (ता. 3) सकाळी पाच वाजता २१ किमी मॅरेथॉनला सुरुवात होईल. सदर्न कमांडचे मुख्य कमांडर ए. के. सिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनचे उद्घाटन होईल. दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात येणार आहे.  पुणे महानगरपालिका, वायरलेस, पुणे जीएसटी विभाग, पुणे पोलिस, भारतीय वायू सेना, कारागृह विभाग आणि इन्कम टॅक्स स्पोर्ट्स अॅण्ड रेक्रिशन क्लब, पुणे यांचा मॅरेथॉनला सहयोग लाभला आहे.