सामना विजयासाठी भारतासमोर १६१ धावांचे आव्हान

    न्यूझीलंड मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs Newzealand) यांच्यात टी २० मालिकेतील तिसरा सामान खेळवला जात आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताला विजयासाठी न्यूझीलंड संघाने १६१ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी २० षटकात १६० धावा केल्या आहेत.

    नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत असून दुपारी १२ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंड संघाने फलंदाजीला चांगली सुरुवात केली. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी समोर ते अधिक काळ तग धरू शकले नाहीत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी २० मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. परंतु दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला ६५ धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारत या टी २० मालिकेत सध्या १-० च्या आघाडीवर आहे. तेव्हा तिसरा सामना भारतीय संघाने जिंकल्यास त्यांना मालिका विजय प्राप्त करता येणार आहे. हार्दिक पांड्या या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. याविजयामुळे टी २० विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल.