T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाले संघात स्थान

भारताच्या संघात कर्णधार रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळाले आहे.

  टीम इंडिया : T20 World Cup 2024 साठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीची आज 30 एप्रिल रोजी बैठक पार पडली. यामध्ये भारताच्या संघात कर्णधार रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal), विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांना संघात स्थान मिळाले आहे. शुभमन गिलला राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले आहे. मंडळाला शिवम दुबेवरही (Shivam Dube) विश्वास आहे.

  त्याचबरोबर पुनरागमन केलेल्या रिषभ पंतला सुद्धा जागा मिळाली आहे आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला संघात स्थान दिले आहे. सॅमसन आणि पंत आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) 9 सामने खेळले आहेत आणि 385 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत. हार्दिक पांड्या संघाचा उपकर्णधार असणार आहे. गोलंदाजीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे फिरकी गोलंदाज असणार आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग, जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांना संधी मिळणार आहे.

  संघामध्ये या राखीव खेळाडूंना मिळाले स्थान
  शुभमन गिलच्या जागेबाबत साशंकता होती. मात्र, मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. शुभमनला राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याच्यासोबत रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.

  T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय क्रिकेट संघ –

  रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान