A case has been registered at Bhor police station against those who submitted fake affidavits of project victims, read in detail

  भोर : प्रकल्पग्रस्त दाखला मिळविण्यासाठी कुटुंबाच्या वंशावळीचे अपूर्ण व दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीवर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश संतोष दानवले (रा. बारे बु., ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या आदेशानुसार मंडलअधिकारी सुनील नारायण धर्मकांबळे यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  वंशावळीची माहिती देऊन प्रकल्पग्रस्त दाखला

  याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषीकेश संतोष दानवले (रा. बारे बु., ता. भोर) यांनी भोर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे १ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जासोबत त्यांनी दिलेल्या दोन्ही प्रतिज्ञापत्रामध्ये मयत महादू बाळू दानवले यांच्या वारसांच्या वंशावळीची माहिती देऊन प्रकल्पग्रस्त दाखला प्राप्त करून घेतला होता. परंतु, मयत महादू दानवले यांच्या वारसांची वंशावळ ही अपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचा तक्रारी अर्ज रामदास उत्तम दानवले (रा. ५१३ श्री कृष्णा सहकारी गृह निर्माण संस्था महाविर नगर, कांदीवली पश्चीम) यांनी भोरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केला.

  भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  अर्ज प्राप्त झाल्यानंतर राजेंद्र कचरे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जानेवारी २०२३ रोजी स्थानिक चौकशी केली असता मयत महादु बाळा दानवले यांना इतरही वारसदार आहेत हे आढळून आले. ऋषीकेश दानवले यांनी प्रकल्पग्रस्त दाखला मिळविण्याकरीता प्रतिज्ञापत्रामध्ये वंशावळीची अपूर्ण माहीती सादर करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली असल्यामुळे मंडलअधिकारी सुनील धर्मकांबळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४२० नुसार ऋषिकेश दानवले यांच्यावर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  गैरकृत्यात सहभागी असणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

  सदर घटनेचा पुढील तपास भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. एम.चव्हाण करीत आहेत. या कारवाईबद्दल भाटघर धरणग्रस्त व पीडित कुटुंबाने विशेषतः मूळ प्रकल्पग्रस्त मयत महादू बाळा दानवले यांचा ९५ वर्षांचा मुलगा पदु महादू दानवले यांनी भोरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडलअधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच या प्रकरणातील गैरकृत्यात सहभागी असणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.