दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानावर आढळला साप

    आसाम : काल रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत (India Vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या टी २० मालिकेतील दुसरा सामना आसामच्या गुवाहाटी येथील क्रिकेटच्या स्टेडियमवर खेळवण्यात आला. यावेळी भारतीय संघ फलंदाजी साठी मैदानात उतरला असताना मैदानावर एका सापाची (Snake) इंट्री झाली. या सामन्यादरम्यान मैदानात आलेल्या सापाला पाहून सर्वांचीच तारांबळ उडाली.

    भारत आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली होती. तोपर्यंत मैदानावर अचानकपणे आलेल्या सापाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सापाला मैदानातून बाहेर काढेपर्यंत सामना थांबवण्यात आला.सध्या क्रिकेटच्या मैदानावर साप अवतरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    रोहित (Rohit Sharma) आणि राहुलची (K L Rahul) वादळी खेळी रोखणं आफ्रिकेच्या गोलंदाजांना जमले नाही ते यावेळी एका सापाने करून दाखवले. सामना थांबला त्यावेळी सात षटके पूर्ण झाली होती आणि भारताने बिनबाद ६८ धावा केल्या होत्या.

    सध्या भारतात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) यांच्यात टी २० मालिका सुरु आहे. रविवारी गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.