दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सला झाला मोठा फायदा, वाचा सविस्तर

आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा राजस्थान हा दुसरा संघ ठरला आहे.

    राजस्थान रॉयल्स : इंडियन प्रीमियर लीग 2024चा (Indian Premier League 2024) 64वा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. दिल्लीच्या या विजयाचा राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) चांगलाच फायदा झाला आहे. कालच्या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या प्रभावामुळे राजस्थान रॉयल्सच्या संघाने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा राजस्थान हा दुसरा संघ ठरला आहे.

    मागील सलग तीन सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राजस्थानच्या संघाचे डोळे दिल्ली विरुद्ध लखनौ सामन्यावर लागले होते. कालचा सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीने दमदार खेळ दाखवत लखनौचा 19 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सनंतर प्लेऑफमध्ये पोहोचणारा राजस्थान हा दुसरा संघ ठरला आहे. मात्र, राजस्थानला अजूनही अव्वल स्थानावर लीग टप्पा पूर्ण करण्याची संधी असेल.

    लखनौ विरुद्ध दिल्ली सामन्याचा अहवाल

    दिल्लीच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सला 209 धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खूपच खराब झाली. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) कालच्या सामन्यांमध्ये फक्त 5 धावा करून बाहेर पडला. यानंतर क्विंटन डी कॉकही केवळ 12 धावा करून इशांत शर्माचा बळी ठरला. अक्षर पटेलने मार्कस स्टॉइनिसला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दीपक हुडाला खाते न उघडता इशांत शर्माने बाद केले. लखनौचा निकोलस पूरनने एका टोकाकडून तुफानी फलंदाजी करत अवघ्या 27 चेंडूत 61 धावांची स्फोटक खेळी खेळली. मात्र, दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळू शकली नाही. पूरनने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले. अखेरच्या षटकांमध्ये अर्शद खाननेही संघाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि 33 चेंडूत 58 धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.