गुरदीपच्या यशानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताची पदक संख्या दहावर

    बर्लिंगहम येथे होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या (Commonwealth Game 2022) ६ व्या दिवशी गुरदीप सिंह (Gurudip Singh) याने १०९+ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कामे केली आहे. गुरदीपने जिंकलेल्या पदकामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताची वेटलिफ्टिंगमधील (Weightlifting) पदक संख्या दुहेरी आकड्यात म्हणजेच १० पदकांवर पोहचली आहे. गुरदीपने अंतिम सामन्यात तब्बल ३९० किलो वजन उचलून पदकाला गवसणी घातली.

    गुरदीपने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ३८८ किलो वजन उचलले होते. त्यामुळे त्याच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची आशा होती. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेपेक्षा राष्ट्रकुल स्पर्धेत दोन किलो वजन जास्त उचलले. गुरदीप सोबत वेटलिफ्टिंग पुरूष १०९ + किलो वजनीगटात पाकिस्तानच्या मोहम्मद नूर दस्तगिर बट्टने एकूण ४०५ किलो वजन उचलत गेम रेकॉर्डसह सुवर्ण पदक पटकावले. तर न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यूने एकूण ३९४ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले.

    गुरदीपने राष्ट्रकुल स्पर्धेच्या १०९ + किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात १६७ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न फसला. त्यानंतर गुरदीपने दुसऱ्या प्रयत्नात १६७ किलो वजन यशस्वीरित्या उचलले. तिसऱ्या प्रयत्नात गुरदीपने वजन वाढवत १७३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्यात यश आले नाही. त्यामुळे स्नॅच फेरीत गुरदीप इंग्लंडच्या गॉर्डन शॉ सोबत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

    स्नॅच प्रकारातील दोन प्रयत्न वाया गेल्यानंतर गुरदीपने क्लीन अँड जर्कमध्ये दमदार पुनरागमन केले. त्याने पहिल्याच प्रयत्नात २०७ किलो वजन उचलले. त्यामुळे त्याचे क्लीन अँड जर्कच्या पहिल्या प्रयत्नानंतर एकूण वजन ३७४ किलो झाले. मात्र गुरदीपला दुसऱ्या प्रयत्नात २१५ किलो वजन उचलण्यात अपयश आले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात गुरदीपने २२३ किलो वजन यशस्विरित्या उचलत गेम रेकॉर्ड बनवला. त्याने एकूण ३९० किलो वजन उचलले.

    पाकिस्तानच्या मोहम्मद नूर दस्तगिर बट्टने क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात २२५ किलो वजन उचलले. त्यामुळे त्याचे एकूण वजन ३९८ किलो झाले. बट्टने दुसऱ्या प्रयत्नात २३२ किलो वजन उचलून सुवर्ण पदकाची आपली दावेदारी प्रबळ करत त्याने एकूण उचलेले वजन ४०५ किलो पर्यंत पोहचले होते . त्यामुळे भारताचा वेटलिफ्टर गुरदीपला तिसऱ्या क्रमकांकावर समाधान मानावे लागले.